ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या बॅनर वर पक्षाच्या नावासह अध्यक्षांच्या छायाचित्रांचा गैरवापर करणाऱ्यांवर कार्यवाहीची वंचित बहुजन आघाडीची मागणी
राजुरा, 8 ऑक्टो. : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतर्गत तालुक्यातील अहेरी प्रचार बॅनर वरील मजकुरात अनधिकृत व बेकायदेशीर रित्या वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा उल्लेख तसेच राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र टाकून जनतेत संभ्रम निर्माण करण्यात आला. तसेच अधिकृत पक्षांच्या युतीची परवानगी नसताना तीन पक्षांची नावे टाकून निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली. यामुळे पक्षाची व स्थानिक कार्यकर्त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र करण्यात आले.
सदर गंभीर घटनेची दखल घेऊन चौकशी करण्यात यावी. सदरचे बॅनर व पोश्टर जप्त करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा राजुराच्या वतीने पोलीस स्टेशन राजुराचे प्रभारी सहायक निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून काल करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, तालुकाध्यक्ष सुशील मडावी, जिल्हा उपाध्यक्ष तथा राजुरा तालुका निरीक्षक रमेश लिंगमपल्लीवार, जिल्हा सचिव अमोल राऊत, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, सुरेंद्र फुसाटे, किशोर देवीगडे, गौतम चांदेकर, स्नेहल दहागावकर, सागर चांदेकर, अमोल चांदेकर आदी उपस्थित होते.