रेती व दारू तस्करीची सी. आय. डी. मार्फत चौकशी करावी.
गांधी जयंती च्या दिवशी सर्वात जास्त तस्करी होत असलेल्या मोटेगाव रेतीघाटावर २५ आप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपोषण.
रेती व दारू तस्करीच्या दररोज च्या घटनांमुळे विदर्भात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या चिमूर विधानसभा क्षेत्राची आज ‘भ्रष्टाचाराची राजधानी’ म्हणून नवीन ओळख तयार झाली आहे. यात राजकीय पक्षाचेच लोक अनेकदा रंगेहात पकडले गेले असूनही किरकोळ कारवाही होऊन राजरोसपणे पुन्हा-पुन्हा रेती व दारू तस्करी उघडपणे चालू आहे. या सर्वांसाठी येथील ‘सोंगाडे’ राजकारणीच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी चिमूर विधानसभेचे नेते प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी केला आहे.
कोरोना काळात संचारबंदीच्या आड तस्करी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विलक्षण वाढ झालेली आहे. रेती व दारू तस्करीची सी. आय. डी. मार्फत चौकशी करावी यासाठी आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभेतील सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांतर्फे गांधी जयंतीनिमित्त उपोषण केल्या गेले.
रेती चोरीसाठी सर्वात जास्त चर्चेत असलेल्या व अनेकदा राजकीय लोकांचेच रेती-वाहन रंगेहात पकडले गेलेल्या मोटेगाव येथील रेतीघाटावर आपतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
वाढत असलेल्या चोरी, तस्करी मध्ये येथील राजकीय नेते व काही अधिकारी यांच्या नावाची उलटसुलट चर्चा लोकांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व खरे चेहरे लोकांसमोर यावे हे गरजेचे आहे. आतापर्यंत घडलेल्या या सर्व प्रकरणाची सी. आय. डी. मार्फत चौकशी करावी यासाठी आप चे जिल्हा पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक, सी. आय. डी. विभाग, व जिल्हाधिकारी यांना भेटून सविस्तर माहिती देवून पत्र देण्यात आले अशी माहिती प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधावे व दोषी व्यक्तींवर सरकारी मालमत्ता चोरीचा आरोप लावून ‘देशद्रोहाचा’ खटला चालवावा या उद्देशाने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाची दखल शासनाने न घेतल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल तसेच शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आम जनता या प्रकरणावर आपला निर्णय घेईल असे आप तर्फे सांगण्यात आले. यादृष्टीने जनमानसात रेती, दारू तस्करी व गावाचे अधिकार याबद्दल जनजागृती करण्यात आली.
उपोषण करणाऱ्यांमध्ये आप चे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे, , मंगेश शेंडे, आदित्य पिसे, कैलाश भोयर ,विशाल इंदोरकर, यंशवंत सरदार ,विशाल बारस्कर, सुदर्शन बावणे , मंगेश वांढरे , ओकांर कोवे , सविता हजारे , ज्योती बावणकर ,प्रशिक धमविजय , अनिकेत पिसे , प्रतिक गोंगले व ईतर स्वयंसेवक सामील होते.