लम्पी संसर्ग वाढत असलेल्या तालुक्यात पशुवैद्यकीय विभागांचे कॅम्प लावा
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
चंद्रपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात लम्पी स्किन डिसीजच्या प्रादुर्भाव होत आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रतिदिन संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात भद्रावती सह इतर तालुक्यात मोठया प्रमाणात या रोगांनी जनावरांच्या अंगावर १० ते २० मी. मी व्यासाच्या गाठी, भरपूर ताप, डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव, चारा, पाणी कमी खाणे, दूध उत्पादनात घाट अशी लक्षणे जाणवत आहे. जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात याच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी कॅम्प लावून लसीकरण करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यासह इतर गावांमध्ये शीघ्रकृती दलामार्फत १६ सप्टेंबरला एकूण १५४२ गोवंशीय जनावरांना लम्पी रोगाचे लसीकरण करण्यात आले. लम्पी त्वचा रोग हा औषधोपचाराने निश्चित बरा होत असून आजारी जनावरांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित व सतर्कता क्षेत्रात मोफत लसीकरण व आजारी जनावरांना मोफत औषधोपचार शेतकऱ्यांच्या दारात करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभाग व जिल्हा यंत्रणेकडून सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज आहे. आजारी जनावरे औषधोपचार करून निश्चित बरे होतात. सदर रोग हा प्राण्यांमधून मनुष्याला संक्रमित होत नसल्यामुळे जनावरांचे दूध सेवनासाठी सुरक्षित आहे. तेव्हा पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेसोबत संपर्क साधण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे चमू तात्काळ पाठविण्याच्या सूचना पत्राद्वारे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.