जेवरा येथे “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” सर्वेक्षणाला सुरवात…
आवाळपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत जेवरा अंतर्गत तांबाडी या महसूली गावामध्ये “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या मोहिमेला दिनांक ३० सप्टेंबर पासुन सुरुवात झाली. मात्र सोशियल मिडीयावरील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये विविध गैरसमज तयार झालेले आहेत. त्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले दिसुन येत होते. अनेक गावकरी तपासणी करण्यास साफ नकार देताना आढळत होते. त्यामुळे दिनांक १ ऑक्टोबर २०२० पासुन कु वैशाली गजानन नवरे (ग्रामपरिवर्तक), श्री मेहेत्रे सर (जि प प्रा शाळा मुख्याध्यापक), सौ. संगिता विधाते (आशा), श्री सिद्धार्थ खाडे (स्वयंसेवक) यांनी एकत्रितपणे सर्वेला सुरुवात केली. अफवा आणि गैरसमज यामुळे काही नागरिक तपासणीला घाबरुन शेजारच्या शेतात लपुन बसले होते. तेव्हा पथकाने त्यांचा मागोवा घेत त्यांना तपासणीचे स्वरुप व महत्व पटवून दिले. तेव्हा त्या नागरिकांनी स्वतः ची तपासणी करुन घेतली. पथकाने नागरिकांचे गैरसमज दुर करत तपासणीचे महत्व पटवून दिले. कोरोना विरुद्ध या लढाई मध्ये संभाव्य धोके, घ्यावयाची काळची, कुंटुबाची जबाबदारी, तसेच या मोहिमे बद्दल मार्गदर्शन केले. परिणामी नागरिकांनी तपासणी करुन मोहिमेला सहकार्य दर्शविले. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी, युवक यांनी स्वतःची व पुर्ण कुटुंबाची तपासणी करुन मोहिमेला उत्तम सहकार्य केले. तसेच इतर गावकऱ्यांनाही तपासणी करण्याचे आवाहन केले. सदर मोहिमे अंतर्गत कुटुंबातील सर्व व्यक्तींचे तापमान डिजिटल थर्मल स्क्रिनिंग गनच्या साहाय्याने घेतले जात आहे. पल्स ऑक्सिमीटर च्या मदतीने शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य आहे का हे तपासले जात आहे. गावातील प्रत्येक घरातील कुटुंबातील सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी केली जात आहे व गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींची तपासणी व त्याच्या नोंदीही ठेवल्या जात आहेत. कोव्हिड १९ पासुन बचावासाठी घरी घ्यावयाची काळजी याबाबत चे पोस्टर गावामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.