सुरजागडच्या लोहखनिज वाहतुकीमुळे रामपूर- सास्ती रस्त्याची दुरवस्था
राजुरा : वेकोलिच्या कोळसा खाणीकडे जाणाऱ्या रामपूर ते सास्ती या तीन किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यात पाण्याचे डबके तयार झाले आहे. संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरजागडच्या लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्याची ही अवस्था झाली असून, या दुरवस्थेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदीनाले तुडुंब भरले आहे. संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आल्याने पाणी रस्त्यावर जमा झाले आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पुरती वाट लागली आहे. याच पावसामुळे रामपूर ते सास्ती या तीन किमी रस्त्याची सुध्दा अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात शेकडो लहानमोठे खड्डे पडले आहे. दिवसागणिक या खड्यांचा आकार जीवघेणा होत चालला आहे. रस्त्यात पाण्याचे डबके तयार झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संपूर्ण रस्ताच खड्याने गिळंकृत केल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तोल जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहे. मुळात अल्पावधीत या रस्त्याची दुरवस्था का झाली असा प्रश्न विचारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखविल्या जात आहे. पण रस्त्याची दुर्दशा ही विभागामुळे नव्हे तर ओव्हरलोड वाहतुकीमुळे झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या रस्त्यावर ३५ ते ४० टनाची मालवाहतूक अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. पण सध्या या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त ६० ते ७० टनांची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. सुरजागडवरून लोहखनिजाची बल्लारपूर रेल्वे सायडिंगवर याच रस्त्याने वाहतूक केली जात आहे. तत्पूर्वी लोहखनिजाची बल्लारपूर मार्गे वाहतूक केली जात होती. पण जनतेनी या ओव्हरलोड वाहतुकीला विरोध केला. त्यामुळे आता रामपूर ते सास्ती रस्त्याने जड वाहतूक सुरू आहे. रस्त्यावरच्या खड्डयांला हीच वाहतूक जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने सुध्दा जड वाहतुकीमुळे रस्ता खराब होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगि असल्याचे समजते. पण सध्या तरी कोणीही ‘ब्र’ शब्द काढायला तयार नाही व नेत्यांनी देखील चुपी साधल्याचे स्पष्ट होत आहे.