आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची होतेय हेळसांड
प्रकल्प अधिकारी मात्र असंवेदनशील
राजुरा/चंद्रपूर, 13 सप्टें. : सम्पूर्ण देशभरात नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गाजावाजा करून थाटामाटात साजरा करण्यात आला. मात्र स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही आदिवासी वसतिगृहाची किती दयनीय अवस्था आहे, याची वास्तव परिस्थिती राजुरा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक 1 व 2 येथे दिसून आली आहे. येथील विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून सदर बाब प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही ते गाफील असल्याने संबंधित विभागाची संवेदशीलता उजेडात आली आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत्मोहोत्सवी वर्षाचे थाटामाटात गाजावाजा करून देखील आम्ही उपेक्षितच आहो याची प्रत्यक्ष प्रचिती आज शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह राजुरा येथे आली. शिक्षणाच्या मूलभूत सुविधा गावाकडे मिळत नसल्याने डोळ्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यातही अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर वसतिगृहात प्रवेश मिळवतात. मग स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जी मेहनत लागते ते सर्व करतात. पण ‘उपाशी पोटी’ किती दिवस कष्ट घेणार. शेवटी संयम सुटतो.
उन, वारा, पाऊस, निकृष्ट दर्जाचे जेवण, बाथरूम ला दरवाजे नाहीत, रूमला खिडक्या नाही, पाऊस आला की शैक्षणिक साहित्य खराब होते. जेवणात अळया ह्या सर्व गंभीर बाबी तक्रार करुन सुद्धा अजून यावर काहीच तोडगा निघाला नाही. यामुळे संबंधित विभाग व राज्यशासनाच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. सदरची शासकीय वसतिगृहे केवळ नावालाच चालविली जातात का…? असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात चांगलाच चर्चिला जात आहे. या सर्व बाबींची तक्रार करूनही प्रकल्प अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत…?
सदर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती वंचीत बहुजन आघाडी च्या जिल्हाध्यक्ष यांना मिळताच ताबडतोब येथे भेट देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या. व त्यांचे सर्व प्रश्न प्रकल्प कार्यालयाला जाऊन सोडविण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. यावेळेस जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्यासह जिल्हा सचिव अमोल राऊत, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, तालुका कार्याध्यक्ष सुभाष हजारे उपस्थित होते.