राज्यात एक अभ्यासक्रम आणि एक जिल्हा ; एक गणवेश धोरण आखावे
विषय शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरुन ६० वर्षे करावे
पांदण रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करा
विषयतज्ञांना कमीत कमी दहा हजार मानधन द्या
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विधानसभेत विविध मागण्या
चंद्रपूर – खाजगी कॉन्व्हेंट शिक्षणाच्या माध्यमातून पालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून, गणवेश आणि शालेय पुस्तकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्यांमध्ये एक जिल्हा, एक गणवेश आणि एक अभ्यासक्रम असावा अशी मागणी भद्रावती- वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पावसाळी अधिवेशनात आज 23 ऑगस्ट रोजी केली.
त्या म्हणाल्या, मीसुद्धा जिल्हा परिषद शाळा शिकली आहे. आपल्याला फक्त एकच ड्रेस असायचा आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की, कपडे धुण्यासाठी आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची. मात्र आता ज्या काही खाजगी शाळा आहे त्या खऱ्या अर्थाने पालकांना खर्चाचा बोजा वाढवीत आहेत. हा न झेपणारा आहे. म्हणून कुठेतरी पालकांचा हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शासनाने प्रत्येक ठिकाणी एकच अभ्यासक्रमाची पुस्तके हे कशी देता येईल, असे धोरण आखावे, त्यासोबत एक शाळा, एक गणवेश किंवा एक जिल्हा; एक गणवेश ही संकल्पना संपूर्ण राज्यात कशी राबवता येईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली. या खाजगी शाळांच्या माध्यमातून जे पालकांचे शोषण होत आहे, ते त्या ठिकाणी थांबवण्यात येईल.
यावेळी त्यांनी शालेय, ग्रामविकास आणि शाळांना अनुदान या विषयावर चर्चा केली. पूरपरिस्थितीमुळे माझ्या सुद्धा मतदारसंघात साधारणतः 33 ते 35 गाव हे पूर्णपणे पाण्याखाली आले. त्यांना मदत देण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिलेली स्थगीती तात्काल हटवून आणि ग्रामीण मतदारसंघात जे काम करणारे आमदार आहेत त्यांना प्रामाणिक न्याय या सरकारच्या माध्यमातून द्यावा, अशी रास्त मागणी त्यांनी केली. आदिवासी विभागाअंतर्गत चर्चा करत असताना दर्जा वाढीचे अनेक प्रस्ताव आदिवासी विभागात अजूनही प्रलंबित आहे, कुठेतरी प्रस्ताव तात्काळ मंजूर करून प्रत्येक शाळांना या ठिकाणी न्याय देण्यात यावा, शासनाकडे मागणी केली.
विषय शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरुन ६० वर्षे करावे
शालेय शिक्षण व क्रिडा विभागा अंतर्गत चर्चा करीत असतांना त्या म्हणाल्या कि, चंद्रपूर जिल्हयासह राज्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यापैकी गणित, इंग्रजी, विज्ञान ही पदे इतर शिक्षक शिकवू देखील शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याचे अतोनात नुकसान होत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी. हे जर शक्य नसले तर त्वरीत इंग्रजी व विज्ञान, गणित पदाकरिता तात्पुरते कंत्राटी शिक्षक भरण्यात यावेत. नाहीतर, सर्वच विभागात सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरुन ६० वर्षे करण्यात यावे जेणेकरुन सर्वच विभागातील कर्मचा-यांचा फायदा शासनाला होईल. अशी देखील विनंती त्यांनी सभागृहात केली.
पांदण रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करा
वरोरा- भद्रावती तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीकडे जाणारे रस्ते चिखलमय होऊन जवळपास नष्ट झाले. वरोरा- भद्रावती मतदारसंघात ग्रामीण भाग जास्त समाविष्ट असल्याने शेतक-यांना शेतीवर जाण्याकरिता पांदण रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यासोबतच ग्रामविकास विभागा अंतर्गत कार्यरत अनेक पदे रिक्त असल्याने शेतक-यां सोबतच नागरिकांना नाहक त्रास सहन त्रास करावा लागत आहे. सदर पदे तात्काळ भरण्याची विनंती त्यांनी दिली.
विषयतज्ञांना कमीत कमी दहा हजार मानधन द्या
सर्व शिक्षा अभियांना अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून विषयतज्ञ या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात यावी. या विषय तज्ञांना मागील चार वर्षापासून वेतनवाढ नाही. एकीकडे वाढत्या महागाई करिता शासनाने महागाई भत्त्यात वाढ केली. परंतू कंत्राटी पदावर असलेल्या या विषयतज्ञांना मागील चार वर्षापासून कोणतेही मानधन वाढ नाही. वाढती महागाई लक्षात घेता त्यांच्या मानधनात कमीतकमी रु. १०,०००/- इतकी वाढ करण्यात यावी. अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सभागृहात केली.