राजुऱ्यात २२ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू…
कुटुंबाला घातपाताची शंका…
राजुरा : येथील रमानगर वार्डात राहणाऱ्या राहुल खोब्रागडे या २२ वर्षीय युवकाचा रेल्वे पटरीच्या बाजूला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. २ ते ३ दिवसा अगोदर मृत्यू झाला असावा असे मृतदेहावरून दिसून येत आहे. दरम्यान राहुलचा संशयास्पद मृत्यू हा घातपात असल्याची शंका कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
रक्षाबंधन सणा करीता राहुल ची बहीण घरी आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुलचा वाढदिवस असल्याने धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरले होते व तयारी करण्यासाठी तो घराबाहेर पडला. राहुल घरी आला नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली पण पत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला राहुल हरवला असल्याची तक्रार दिली. मात्र तिसऱ्या दिवशी रेल्वे पटरीच्या बाजूला मृतदेह आढळून आला. पटरीच्या मधोमध रक्त आढळून आले व चेहरा विद्रुप दिसत असल्याने राहुलचा मृत्यू संशय निर्माण करणारा आहे. त्यातच कुटुंबियांनी सुध्दा घातपाताची शंका निर्माण केली आहे.
राहुल हा नगर परिषद मध्ये कंत्राटी कामगार म्हणून घंटा गाडीवर काम करीत होता. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर कामगारांनी राहुल हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण होत आहे.