संतप्त नागरिकांनी रस्त्यावर पेटविले टायर
चिखल व धुळीने नागरिक त्रस्त; रस्त्याचे बांधकाम कासवगतीने
राजुरा : राजुरा-रामपूर-गोवरी मार्गाचे काम मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ऐन पावसाळ्यामध्ये खोदकाम केल्याने दररोज वाहतूकित मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून पावसाच्या दिवसात मोठ्याप्रमाणात चिखल साचले जाते तर इतर दिवशी धुळीचे लोंढे उडत असल्याने रस्त्यावरील वाहतूकदार व वस्तीतील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून रामपूर येथील संतप्त नागरिकांनी आज (दि. १९) सायं ४ वाजता रस्त्यावर टायर जाळून निषेद्ध केला आहे.
राजुरा-रामपूर-गोवरी रस्ता हा नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे, दररोज या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे, या मार्गावरून शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, वेकोली कामगार व तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्य शेकडो नागरिकांची वर्दळ असतात मात्र कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे व संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्यावर दररोज होणाऱ्या रस्ता जाम यामुळे लागणाऱ्या ट्रकांच्या रांगा या कारणाने पायदळ जाणारे विद्यार्थी, बसने प्रवास करणारे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी वेळेवर शाळेत कार्यलयात पोहचू शकत नाही, तर या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या आजूबाजूने वस्तीने असलेल्या घरात धुळीचे थर साचत असल्याने लहान बालकांपासून तर मोठ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे.
रस्ता जाम घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. यावेळी टायर कोणी जाळले हे माहीत झाले नसले तरी पोलिसांसमोर नागरिकांनी रस्त्यांबद्दल रोष व्यक्त करीत तात्काळ रस्ता दुरुस्ती करणे दररोज रस्त्यावर पाणी मारण्याबद्दल पोलिसांसमक्ष कंत्राटदारांच्या प्रतिनिधीला सांगण्यात आले व वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.