अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येकाने वीरतेच्या इतिहासाचे स्मरण करावे – कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार
जिल्हा प्रशासनातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
पंकज रामटेके /विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : देशाचे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. तर अनेक स्वातंत्र्यवीरांना त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येकाने वीरतेच्या इतिहासाचे स्मरण करून भविष्य घडवावे व त्यासाठी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा प्रशासनातर्फे प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सेनानी डॉ. शेषराव इंगोले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, माजी महापौर राखी कंचर्लावार, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार कांचन जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.
तिरंगा केवळ एक भगवा, पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचा कापड नाही, असे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला या तिरंग्याचा अभिमान असला पाहिजे. स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजांना या देशातून बाहेर घालवण्यासाठी प्रत्येकाच्या हातात झेंडा होता. तिरंगा पाहतांना महात्मा गांधींजींचा संघर्ष, भगतसिंग,राजगुरु, सुखदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा अशा अनेकांचा संघर्ष दिसतो. हजारो- लाखो शहीद या तिरंग्याच्या प्रत्येक कणाकणात दिसतात.
देशभक्तीपर गीत ऐकून सोडून न देता, ‘देशभक्तीं न हो क्षणिक उबाल, मन पे पले पुरे साल’ या भावनेने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाकडे बघावयाचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्टच्या सूर्यास्तापर्यंत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले आहे. हा तिरंगा 13 ऑगस्टला सकाळी 9 वाजता घरासमोर अथवा घरावर लावावा तसेच 15 ऑगस्ट रोजी सूर्यास्तापूर्वी ध्वजाला सन्मानपूर्वक खाली उतरवावे. तिरंगा आणि भारतीय संविधात अनंत कष्टातून आपल्याला मिळाले आहे, याची नेहमी जाणीव ठेवा.
या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांवर जबाबदारी आहे. जगातल्या 193 देशापैकी 14 देशात वाघ आहे आणि या 14 देशापैंकी 65 टक्के वाघ भारतात आहे. देशातील सर्वाधिक वाघ जगातील एकमात्र चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नवीन संसद भवन (सेंट्रल विस्टा) या संसद भवनाच्या दरवाज्याचे आणि आतील सर्व फर्निचरचे लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील आहे. देश तभी आगे बढेगा! जब हम खुद आगे बढेंगे…!, यासाठी स्वतःमध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने माझं गाव, माझा जिल्हा देशात नेहमीच पुढे राहील हा संकल्प करावा, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केल्या जात आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर 100 फुट उंचीचा तिरंगा उभारण्याचे नियोजन करण्यात असून नुकतेच राजुरा येथे 100 फूट उंचीचा तिरंगा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी डॉ. शेषराव इंगोले आणि बाबुराव वनकर यांच्या वतीने त्यांच्या मुलाचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुशील सहारे यांनी आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी मानले.