केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचा सर्वे करून पीकनिहाय आर्थिक मदत द्यावी – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे
अनंता वायसे
हिंगणघाट :-
सततच्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सोयाबीन,कापूस,मोसंबी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली असून केंद्र व राज्य सरकारने सर्वे करून आर्थिक मदत देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात व वर्धा जिल्हा राष्ट्रवादी किसान सभाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले.
वर्धा जिल्ह्याचा महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस मोसंबी संत्रा उत्पादक शेतकरी पावसामुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे, बुरशीजन्य संसर्गाने, शंखशिंपल्यांच्या संक्रमनाने नुसतेनाभूत झाला असून केंद्र व राज्य सरकारने शेताचा सर्वे करून हेक्टरी पीकनिहाय आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदनाद्वारे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने कळविण्यात आले.
यावर्षी खरीपाच्या हंगामाला 10 जून पासून सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या पेरणीला जोरदार सुरुवात झाली सोयाबीनच्या पिकाला जवळपास 100 दिवस पूर्ण होतात तसेच कापसाच्या लावणीला जवळपास 100 ते 120 दिवस होत आहे. 10 ऑगस्ट पर्यंत कमी अधिक पावसाने पिके जबरदस्त डोलत होती. त्या दरम्यान डवरन,निंदन,खताच्या मात्रा चांगल्या पद्धतीने दिल्यामुळे पिके जोमात आली 11 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या सततधार पाणी, विजेचा कडकडाट ,धुके व दड, बुरशीजन्य संसर्ग व किडीच्या प्रादुर्भावाने पाने खाणारी अळी त्यामुळे पात्या, फुले ,शेंगा,बोंडे कोलमडून पडले आहे. सोयाबीनच्या झाडाला शेंगा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात गुरे-ढोरे चरायला सोडले आहेत तर काही शेतकऱ्यांनी शेतात ट्रॅक्टर द्वारे रोटावेटर मारून रब्बीच्या पेरणीला शेत तयार केले आहे .सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून एकरी एक किलो सोयाबीन होणार नाही अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
कापसाचे पीक ऑगस्ट महिन्यात पाती फुलावर असताना 11 ऑगस्ट पासून झालेल्या संततधार पावसामुळे बुरशीजन्य संसर्गामुळे किडीच्या प्रादुर्भावाने बोंडे खाली पडले आहेत. तसेच झाडाला लागलेली बोंडे लालसर आली असून गळून पडत आहे. पराटीचे झाड वाढून आले असून शेंड्यावर पाती फुले आहेत परंतु निसर्गाच्या लपंडावामुळे कापसाची काय परिस्थिती होते हे सांगता येणार नाही.
आर्वी ,आष्टी,कारंजा तालुक्यातील पिकांवरचे टोळधाडीचे संकट गेल्यानंतर आता मोसंबी, संत्रा कपाशीच्या पिकांवर शंख गोंगलगाईचे संक्रमण झाल्यामुळे खूप मोठे संकट उभे झाले आहे तसेच मोसंबी- संत्रा झाडा वर बुरशीजन्य संसर्ग, ऑरेंज रॉट या रोगाने थैमान घातल्यामुळे फळे गळून पडली आहेत. टप्प्याटप्प्याने गळलेली मोसंबी शेतकऱ्यांनी जवळपास तीन वेळा शेताच्या बाहेर फेकून दिली आहे अशाप्रकारे मोसंबी वर संत्र्याच्या झाडासह फळातला रस शोषण केल्याने परिसरातील मोसंबी-संत्राच्या बागा उजाड झाल्या आहे. झाडावर शंखी गोंगलगाईचा थर लटकलेला आहे केंद्र व राज्य सरकारने शेतातील पिकाचा सर्वे करून पिकनिहाय आर्थिक मदत द्यावी असे निवेदन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष संजय काकडे ,रा.काँ.पा आर्वी विधानसभेचे अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे, विनोद पांडे, सुनील निमसडकर, रेवाशंकर वाघ, राजू मडावी, विठ्ठल चौधरी, शितल चौधरी बाळासाहेब महंतरे, अनंत झाडे,गिरधर निंभोरकर इत्यादी उपस्थित होते.