- नागपूर येथील दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर यांची पत्रकाद्वारे सूचना
राजु झाडे-
नागपूर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे दिक्षाभूमिवरील होणार 57 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. सध्या संपूर्ण देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या 14 ऑक्टोबर आणि विजयादशमी या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर दरवर्षी प्रमाणे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. असे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
स्मारक समितीकडून पत्रक जारी
दीक्षाभूमीवर येणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या गर्दीमुळे कोरोना संबधित सूचनांची अमलबजावणी होणे अशक्य आहे. गर्दीत एखादा लक्षणहीन कोरोना बाधित आल्यास सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात टाकणे उचित नाही. अनुयायांच्या हितासाठी हा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. तसेच जनतेला येणाऱ्या 14 ऑक्टोबर आणि अशोक विजयादशमी 25 ऑक्टोबर 2020 रोजी आपापल्या घरीच बौद्धवंदना व बाबासाहेबाना वंदन करतील, असे आवाहन करण्यात आले आहे.
दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे कोणताच कार्यक्रम होणार नाही व दुकानांना सुध्दा परवानगी देता येणार नाही. आपल्या बांधवांचे आरोग्य लक्षात घेता समितीला सहकार्य करावे. स्मारक समिती पदाधिकारी द्वारे आणि शासनांद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून व ती दक्षता घेऊन बाबासाहेबाना यथोचित मानवंदना देतील. असे आवाहन समितीद्वारे प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे. भारतभरातून येणाऱ्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी पत्रकातून सांगितले आहे.