शासन, प्रशासन आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सपशेल दुर्लक्ष
भूषण मधुकरराव फुसे, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, वंचित बहुजन आघाडी
राजुरा, 28 जुलै : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण मधुकरराव फुसे यांनी राजुरा तालुक्यातील चुनाळा पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधाला भेट देताच शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
डोळ्यात अश्रू आणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना सांगितले की, शेतात जायला पक्के पांदन रस्ते नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या शेतात गुडघा भर चिखलातून शेतात जावे लागते. चांगल्या रस्त्यांअभावी खते व इतर शेतीची साधने आगाऊ (पावसाळ्यापूर्वी) आपल्या शेतात आणून साठवून ठेवावी लागतात. या महिन्यात अचानक आलेल्या पुरामुळे शेतातील सर्व वस्तू वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांनी धाडस करून दुसऱ्यांदा शेती केली पण धरणांमधून जास्त पाणीपुरवठा झाल्यामुळे काही दिवसांतच दुसऱ्यांदा शेती पाण्याखाली गेली. या पुरामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही शेतकरी पतसंस्था आणि बँकांकडून कर्ज घेतले आहे आणि आता गंभीर आर्थिक बोझाखाली आहोत. काही शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि जर या सरकारने आम्हाला त्वरित आणि पुरेसे मदत पॅकेज दिले नाही तर आणखी बरेच शेतकरी आत्महत्या करतील. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भगीरथ वाकडे, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, चूनाळा येथील शेतकरी गजानन माशिरकर, मनोहर निमकर, विनोद कार्लेकर, कवीश्वर निमकरसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
“चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांना नोकरशाहीच्या अडथळ्याशिवाय मदत देण्यात यावी.”
– भूषण फुसे, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, वंचित बहुजन आघाडी