चुनाळा येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या
सतत चारदा पाण्याखाली आले शेतपिक ; घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
राजुरा : यावर्षी सतत पडत असलेल्या पावसाने आलेल्या पुराच्या पाण्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर काहींचे जीवन संपले आहे. याचाच एक बळी चुनाळा येथिल रविंद्र नारायण मोंढे (वय ४५) हा युवा शेतकरी ठरला असून याने (दि. २७) आपल्या राहते घरी दुपारी दीड वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रविंद्र यांच्याकडे सात एकर जमीन आहे, त्यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित चुनाळा येथून शेतीकरिता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. रविंद्र हा एकुलता एक मुलगा असल्याने घरच्या माताऱ्या आई वडिलांचा सांभाळ वर्षभर शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर करीत होता. मात्र या एक महिन्यात चार वेळा पुराच्या पाण्याखाली शेतपिक आल्यामूळे संपूर्ण पीक उध्वस्त झाले. त्यापूर्वीही दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले. अशातच रवींद्र यांच्या आईला विद्युत तरच शॉक लागल्याने त्याही दवाखाण्यात उपचार घेत होत्या. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून हात उसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या रविंद्रने आपल्या राहते घरी कोणीच नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केल्याचे जवळच्या नागरिकांच्या लक्षात आले असता राजुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता राजुरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. रविंद्र यांच्या पश्चात्य आई वडील असून रविंद्रच्या जाण्याने मोंढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.