आरक्षण निश्चिती व प्रारूप प्रसिद्धी कार्यक्रम जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण ; हरकती सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सादर करा
राजुरा : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम ( १ ), कलम 58 ( १ ) ( अ ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम , 1996 नुसार अनुक्रमे जिल्हापरिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राजुरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षणाबाबत (दि. २८ जुलै) रोज गुरूवारला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय राजुरा येथे सभेचे आयोजन केले असून आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धी करणे दिनांक २९ जुलै या असून आरक्षणाबाबत काही हरकती सूचना असल्यास दिनांक २९ जुलै ते २ ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांच्याकडे सादर करण्याचे आव्हान उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.