अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब आहे – अजित पवार
तुमच्याकडे बहुमत आहे तर का घेत नाही अधिवेशन; बहुमत घेतले ना मग अजून किती सत्तेची भूक आहे ते तरी सांगा… सरकार बनवलं ना मग लोकांचे प्रश्न सोडवा ना…
तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…
निसर्गाचा प्रकोप झाला त्यावेळी एसडीआरएफचे नियम बाजुला ठेवुन आम्ही मदत केली परंतु आज निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत आहे…
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई दि. २५ जुलै – राज्यात दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले असताना मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही हा खरंतर राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान आहे. तुम्हाला बहुमत आहे तर मंत्रीमंडळ अस्तित्वात आणा. आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सध्या राजकीय घडामोडीमुळे राज्याचे अधिवेशन झाले नाही. आता मुख्यमंत्री दौरा काढणार आहेत. मात्र अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी लोकप्रतिनिधी फिरल्यानंतर आकडेवारी मांडण्याचे एकमेव साधन अधिवेशन आहे. तुमच्याकडे बहुमत आहे तर का घेत नाही अधिवेशन असा रोखठोक सवालही अजित पवार यांनी शिंदे सरकारला केला.
राष्ट्रपतींचे मतदान सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला तातडीने दिलासा द्या आणि आलेल्या आपत्तीमध्ये लक्ष घाला असे आम्ही सांगितले होते आणि आजही ओला दुष्काळ जाहीर करुन तात्काळ अधिवेशन घ्या अशी मागणी पत्राद्वारे केल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.
सध्या राज्यातील धरणाची पाणी परिस्थिती सुधारली आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. काही ठिकाणी पाहणी केली असून आताही काही भागात जाणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
निसर्गाचा प्रकोप झाला त्यावेळी एसडीआरएफचे नियम बाजुला ठेवुन मदत केली होती. परंतु आज निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत आहे. जनता अडचणीत असताना मदत का करत नाही. प्रसंग आलाय तर तातडीने अधिवेशन बोलवा असा सज्जड इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.
तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत विश्वस्त मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. जनतेच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संपर्क करावा व जी चर्चा सुरू आहे त्याला पायबंद घालावा आणि वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
बांठिया आयोग नेमताना आम्ही सकारात्मक होतो. ग्रामविकास खाते, आमचे सर्व मंत्री यामध्ये काम करत होते. इम्पिरिकल डाटा गोळा करून दिल्याने सगळ्यांच्या प्रयत्नाने हे घडले आहे.मागणी सर्वांची होती. यामध्ये कोणताही वाद नव्हता याचे समाधान आहे असेही अजित पवार म्हणाले.
हवामान खात्याचे अंदाज सध्या चुकायला लागले आहेत. रेड अलर्ट देतात आणि पाऊसच पडत नाही मात्र शाळांना सुट्टी जाहीर होते. हवामान खात्यावर केंद्रसरकारने व राज्याने हवा तो खर्च करावा आणि सुधारणा करावी. हवामान खात्याने जाहीर केले की पाऊस पडतच नाही याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
एकंदरीतच मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही हे शिंदे व फडणवीस यांना माहीतच असेल. त्या दोघांना आपलं चांगलं चाललंय असं वाटतंय असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
शिंदेनी तर आमच्या सरकारमध्ये काम केले तेच आज आमच्या सरकारमधील कामांना स्थगिती देत आहेत. सरकारे येत असतात जात असतात… हे सरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का? विकासकामे आहेत. ती का थांबवत आहात… आमच्या घरातील कामे आहेत का? जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आला होता हे लक्षात घ्या असेही अजित पवार यांनी सरकारला खडसावले.
दिल्लीत हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत ते दोघे काय करतील असे वाटत नाही. आता चंद्रकांत पाटील यांनी कशावर दगड ठेवला माहीत नाही. त्यावर सभागृहात सांगतो त्यांनी कुठे दगड ठेवला आणि कुठे ठेवला नाही तेही असा खोचक टोलाही अजित पवार यांनी लगावला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्याचे प्रतिनिधी असतात. बबनराव शिंदे हे काम असल्यामुळे भेटायला गेले होते अशी प्रतिक्रियाही अजित पवार यांनी बबनराव शिंदे यांच्या भेटीवर माध्यमातून सुरू असलेल्या चर्चेवर दिली.
राज्यपालांना भेटलो तर ते म्हणतील यादी येऊ दे करतो लगेच… ते त्यासाठी तयार आहेत असेही अजित पवार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.
भूकंप – भूकंप होणार असे अजूनही बोलत आहेत. अजून किती हवे आहेत. त्यांनी बहुमत घेतले ना मग अजून किती सत्तेची भूक आहे ते तरी सांगा… सरकार बनवलं ना मग लोकांचे प्रश्न सोडवा ना अशा स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडसावले.
जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावू नका अशी आम्ही मागणी केली होती आता केंद्रसरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचे कान टोचले.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, माजी खासदार आनंद परांजपे आदी उपस्थित होते.