कल्पवृक्षाच्या पाना, फळांनी साकारला विठुराया!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मसुरे : पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना देखील अनन्यसाधारण महत्व आहे याची जाणीव करून देणारा एक संप्रदाय म्हणजेच आपला वारकरी संप्रदाय होय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया देखील वारी करीत असतात. वर्षाचे अकरा महिने घर , संसार, चूल , मूल, शेत आणि व्यवसाय सांभाळणाऱ्या स्त्रियांना जेव्हा वारीचे वेध लागतात तेव्हा त्यांच्या मनात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागतात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणातील स्त्रियांना देखील या वारीचा मोह आवरता आला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील केर आणि मोर्ले या गावातील स्त्रियांनी एकत्र येऊन कल्पवृक्षाच्या पांनाचा आणि फळांचा वापर करून विठुराय साकारला आहे. या अनोख्या निसर्गवारीतून त्याचे निसर्गाबद्दल असलेले प्रेम आणि चराचरात त्यांना दिसणारा विठ्ठल याचे साक्षात दर्शन घडवले आहे.
ही मूळ संकल्पना श्रीरंग चॅरिटेबलचे डॉ. सुमित पाटील यांची असून त्यांनी स्वतः या वारीच्या छायाचित्रणाचे दिग्दर्शक केले आहे. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद आडेलकर याने या वारीचे चित्रीकरण केले आहे. डॉ. प्रणव प्रभू यांनी या वारीचे लेखन आणि उदय सबनीस यांनी आपल्या भारदस्त आवाजात या वारीचे विश्लेषण केले आहे. किशोर नाईक, संकेत ठाकूर , विजय वालावलकर , योगेश राजे भोसले, गौरेश राणे, वैभव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या निसर्गवारीचा व्हिडीओ सुद्धा सध्या समाज माध्यमांवर खूप चर्चेचा विषय बनत आहे.