पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपूरात घ्या – आ किशोर जोरगेवार
दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामूळे आता होणार असलेले पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलतांना केली आहे. आज सभागृहाचे विशेष सत्र बोलावत राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व अपक्षांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतांना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.
महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर नगरीत नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन घेतले जाते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020 चे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले नाही. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र ते अधिवेशनही मंबई येथे घेण्यात आले. विदर्भातील कामगारांचे प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकर्यांची आत्महत्या, रस्त्यांची दुर्दशा, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास विदर्भातील असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व आहे.
त्यातच उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा अनुशेष सर्वाधिक आहे आणि ते भरून काढणे आवश्यक आहे. त्यामुळ विदर्भातील जनता दरवर्षी नागपूर अधिवेशनाची आतुरतेने वाट बघत असते. त्यांना राज्याच्या दुसर्या टोकावर असलेल्या मुंबईकडे दरवेळी प्रवास करणे शक्य नसल्याने नागपूर अधिवेशनात त्यांना आपले प्रश्न मांडता येते. नागपूर करारानुसार काही काळासाठी सरकार नागपुरात आणले जाईल आणि राज्य कायदे मंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात होईल आणि किमान ६ आठवड्याचे विधानसभेचे सत्र नागपुरात होईल असे ठरले आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. आज राहुल नार्वेकर यांची मतदान प्रक्रियेने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी शुभेच्छा प्रस्तावावर बोलत असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली आहे. तसेच यावेळी बोलतांना त्यांनी सर्व अपक्ष आमदारांच्या वतीने नवनिर्वाचीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी नविन सदस्यांना विषेश प्रशिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. आता तुम्ही महाराष्ट्राच्या प्रथम स्थानी आहात हे स्थान सर्वसामान्य माणसाच्या हिताचे काम करणार ठराव अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. अपक्षांकडे विशेष लक्ष देत त्यांच्या भावना मांडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यावा असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.