नलफडी नाल्यात रेती तस्करांचा धुडगूस…

0
663

नलफडी नाल्यात रेती तस्करांचा धुडगूस…
●तस्करांना अभय कुणाचे?

 

 

राजुरा : सध्या तालुक्यात रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. महसूलखाते‘ च्या ढिलाईमुळे तस्करांना मोकळे रान मिळत आहे. नलफडी नाला रेती तस्करांसाठी वरदान ठरत आहे. नाल्यात बारीक रेतीचा साठा असल्याने सध्या या नाल्यात ६ ते ७ तस्करांनी धुडगूस घातला आहे. रेतीचा उपसा सुरू असतानादेखील महसूल कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, रेती चोरीसाठी काही महाभागांना ‘दक्षिणा‘ मिळत असल्याची जोरात चर्चा आहे.

 

तालुक्यात असंख्य लहानमोठे महसुली नाले आहे. तसेच वर्धा नदी सुध्दा वाहते. यात विहिरगाव, नलफडी, विरुर, खांबाला, टेबुरवाही, बेरडी, सोंडो, तुलाना, सुमठाणा, कापणगाव, सातरी चुनाळा आदी नदीनाल्यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून या नदीनाल्यातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. पण अजतागत कारवाई शून्य असल्याने शंका निर्माण होत आहे. महसूल ‘खाते’ च्या याच ढिलाईमुळे तस्कर बिनदिक्कतपणे रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, नलफडी नाला चर्चेत असून या नाल्यात ६ ते ७ तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. हा नाला जंगलाला लागून असल्याने बारीक रेती जमा होत असते. सध्या या नाल्यातून रेतीचा अवाढव्य उपसा करण्यात येत आहे. नाल्यात खड्डे खोदून रेतीचे ढीग तयार करण्यात येत आहे. रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असल्याने नाल्याच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, या नाल्यातून रेतीची चोरी करण्यासाठी काही महाभागांना ‘दक्षिणा‘ द्यावी लागते, अशी चर्चा आहे. रेती चोरीमुळे महसूल बुडत असतानासुध्दा महसूल कर्मचारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शंका निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here