ईडी, न्याय व्यवस्था केंद्राच्या दासी…!

0
657

ईडी, न्याय व्यवस्था केंद्राच्या दासी…!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

 

आधी धर्म आणि आता हिंदुत्व हेच सत्ता हासील करायला कारणीभूत ठरत आहे. ज्यांचा धर्म, हिंदुत्व आणि लोकशाहीच्या मुल्यांशी काहीही संबंध नाही तेच आकाडतांडव करत आहेत. ते फक्त आणि फक्त स्वतःच्या अकार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली जावू नयेत आणि त्याही पेक्षा बेहिशेबी मालमत्ता ईडीच्या डोळ्यात भाजपाने आणून दिली तर आपलाही देशमुख, मलिक होऊ नये म्हणून राज्यातील बारा कोटी जनतेला कंठस्नान घालण्यासाठी दुर्दैवी आक्रमण करीत आहेत. सत्तेचे हे अधर्मी, सुडाचे महाभारत सुरु झाले आहे.

 

 

महाभारतात 18 देश सहभागी झाले होते. राज्यातील राजकीय महाभारतात दुर्योधन सेनेचा सेनापती म्हणून ईडीने कुरुक्षेत्रावर पहिले शंख फुंकले आहे. कौरव सेनेचे महाभारतात पाच सेनापती झाले होते. पहिले सेनापती होते खुद्द भीष्मचार्य पितामह, साक्षात आठवा वसू प्रभास, दुसरे गुरु द्रोणाचार्य, तिसरा कर्ण , चौथे शल्य पाचवे आश्वत्थामा…
पांडवांच्या बाजूने साक्षात, ‘न धरी करी शस्त्र मी’ अशी प्रतिज्ञा घेवून उचित वेळी मोडून अर्जुनाचे सारथी बनलेले भगवंत श्रीकृष्ण, राजा धुष्टधुम्न हे सेनापती होते. 18 दिवस आणि एक रात्र चाललेलं हे युद्ध 40 कोटी 34 लाख 11 हजाराहुन कौरव सेनेचा उध्वंस करणारे ठरले. पांडवांचे 11 औक्षिणी सैन्यही कापले गेले. हाडामांसाचा खच पडला होता… कित्येक सैन्यावर तर शेवटचे अंत्यसंस्कारही करता आले नाही.
आज महाराष्ट्राच्या जनतेची अवस्था कुरुक्षेत्रावर हौतात्म्य पत्करलेल्या त्या शूर योद्धा आणि सैन्यासारखी झाली आहे. त्यात केवळ शिवसेनेचे सैनिकच नाहीत. तर राष्ट्रवादीचे घड्याळधारी, काँग्रेसचे पंजाधारी, मनसेचे इंजिनवाले आणि इतर गटांचे कार्यकर्ते कळत न कळत ओढले गेले आहेत. भाजपा तर राज्यातील सत्ता गेल्यापासून डोळ्याला डोळा न लागलेल्या आणि सुडाने पेटलेल्या विरांगणेसारखी अखंड धगधगत आहे. त्यांच्या जोडीला ईडी नावाची यंत्रणा आहे. केंद्रातील सरकारने त्या यंत्रणेला दासी बनवली आहे. सत्तेच्या पलंगावर शय्यासोबत न करणाऱ्यांना ती दासी पदरात ओढून व्याभिचारी ठरवत आहे. अगदी त्यांच्या अब्रूवर घाला घालत आहे. आणि तर आधीच चक्रव्युहात अडकलेले काही बदमाश बरोबर त्या दासीच्या बाहूपाशात अडकत आहेत. नव्हे राजाधिराजा देवेंद्र हे फासे दिल्लीश्वरांच्या कृपेने टाकत आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. इथे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करायचे नाही. पण भाजपा नावाचा सर्वात ढोंगी, पापी राजकीय पक्ष शुर्चीभूततेच्या वल्गना करुन, ज्यांना दोषी ठरवले त्याच राजकीय नेत्यांची मोळी बांधून भ्रष्ट्राचाराचा राक्षस पोसत आहे. तरीही ‘मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’, हा राजकीय व्याभिचाराचा प्रयोग राज्यात आणि जवळजवळ देशात सुरु आहे.

 

 

ज्यांच्याकडे भाजपा नेते, गुन्हेगार आणि भ्रष्ट्राचारी, देशद्रोही, समाजद्रोही, धर्म  बुडवे म्हणून उघडपणे बोट दाखवत आहेत, ते सगळे देवेंद्राच्या तालमीत आज जोरबैठका काढत आहेत. असे असताना आता जो काही उत्तम राजकीय गोंधळ घातला गेला आहे, त्याचा शेवट महाराष्ट्राला विनाशाकडे नेणारा आहे. शिवसेनेचे ढोंगी कर्मवीर एकनाथ शिंदे हे कुणाच्या ढोलकीवर नृत्य करीत आहेत, ते सर्वांना माहीत आहे. त्यांच्याकडे सेनेतील असंतुष्टांचा मोठा गट आहे. शिवाय अपक्ष आमदार आहेत. ते सगळे तांत्रिक आणि मांत्रिकतेचे विद्यापीठ असलेल्या कामाक्षीच्या आश्रयाला गेले आहेत. त्यांचा डाव उलटला तर ही राक्षशी विद्या कपाळमोक्ष करते हे शिंदे यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले नाही का? केंद्रात चंद्रास्वामी नरसिंह सरकार चालवायचे. ते मोठे तांत्रिक होते. आज राज्य आणि केंद्रातील सरकार हे तांत्रिकांच्या आश्रयाखाली आहे. दशदेवी हे अधिष्ठान असल्याने शत्रू संहारासाठी राजकीय नेते हे पाऊल उचलतात. त्याचा विपरीत परिणाम राज्य आणि केंद्रातील जनतेवर होत आहे, अगदी सृष्टीचा विनाश करणाऱ्या ब्राह्मस्त्रासारखा!

 

 

आता राजकीय सत्तापालट करण्यासाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. ईडीशिवाय न्याय यंत्रणाही केंद्र शासनाची दुसरी दासी आहे. आता ती आवडती आहे की नावडती ते न्या. लोया यांच्या शवविच्छेदन किंवा काही वर्षापूर्वी दिल्लीत न्यायमूर्तिनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने पाहावे लागेल.

 

लाखो, करोडो वादी, प्रतीवादी, संशयित गुन्हेगार, न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चकरा मारत आहेत. कौटुंबिक कलह प्रकरणातील असाह्य महिलांना न्यायालय दाद देत नाही. फक्त आणि फक्त ‘तारीख पे तारीख’… आता तर न्यायालयातील त्या फाईलमधील कागद सत्य सांगण्याऐवजी कंटाळून आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. अशी भयंकर अवस्था असताना राजकीय दावे-प्रतिदाव्यांसाठी न्यायालये रात्री अपरात्री उघडली जातात आणि झटपट निवाडा देतात. खरंच कितीही तत्परता. याबाबत तरी न्यायालयांचे सामान्य जनतेने आभार मानायलाच पाहिजे. लाखो मेले तरी चालतील पण लाखोंचे पोशिंदे आणि ईडी, सीबीआय, रॉ, राज्य पोलिस दलाच्या वोण्टेड यादीवरील राजकैदी वाचले पाहिजेत तरच सरकारं टिकतील आणि हवे तसे राज्य करता येईल. मग सिंचन घोटाळाही पोटात घालता येईल, हवे त्याला क्लीन चिट देता येईल आणि नको असेल त्याला ईडीच्या अंधारमय कोठडीत डांबून गनिमी कावे केल्याचा आसुरी आनंद घेत राज्य कारभार हाकता येईल.

 

 

आता काय होणार याची नस्ती उठाठेव सामान्यांना लागलेली आहे. ते महागाई विसरून गेले आहेत. डिझेल, पेट्रोल पेटले त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. घशाला कोरड पडली आहे. पाणी नाही आणि आभाळही भरून येत नाही त्याचे काही पडले नाही. कुणी प्रसिद्धीसाठी का होईना पण बेडकाचे लग्न लावायलाही विसरले आहेत. तरुणांना बेकारीच्या खाईत ढकलूनही कुणी क्रांतिकारी आंदोलनाची मशाल पेटवण्याचे धाडस करत नाहीत. सारस्वत फक्त मनोरंजन करणाऱ्या कथा, कादंबरीसाठी बोरु घासून दात कोरत पोट भरत आहेत. पण सत्याचा आरसा दाखविणाऱ्या सद्य:राजकीय स्थितीवर भाष्य करत नाही. केवढीही अनैतिकता…?

 

 

राज्यातील राजकीय घडामोडी पाहता भाजपा पुरता बदनाम झाला आहे. तशी त्यांना इज्जत होतीच कुठे म्हणा? अटलपर्व संपले, अडवाणी विजनवासात गेले आणि भाजपातील सात्विकता लयास गेली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे शिंदे गटाला घेवून पुन्हा सरकार स्थापन करण्याचा उघड प्रयत्न 106 जणांचा नेता करेल असे वाटत नाही. तसें झाले तर ते तोंडघशी पडतील. मग मनसे किंवा प्रहार संघटनेत शिंदे गट विलीन करून सत्ता स्थापनेचा आग्रह होऊ शकतो. भाजपा बाहेरून पाठींबा देईल आणि सहा महिन्यानंतर सरकार पाडू शकतात. यातून शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची ईर्षा पूर्ण होईल. मग मध्यवर्ती निवडणुकाही होवू शकतात. पण महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचा कल बघून किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला ‘शिकवेन चांगलाच धडा’ म्हणत, देवेंद्र सरकार स्थापन करण्याचा डाव खेळतीलही. याला अनेक कंगोरे आहेत. नजिकच्या डावपेचातून ते स्पष्ट होतील. नुकसान मात्र महाराष्ट्राच्या जनतेचे आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत किंवा नसोत. असत्य सध्या ईडीच्या घरी कावडीने पाणी भरत आहे. ते पाणी भाजपा ओंजळीने पिवून जनतेला कोरड्या घशाने सरणावर चढवत आहे. म्हणून भाजपा तुपाशी जेवत आहे. जनता मात्र उपाशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here