रोडवरील पुलात दगड माती टाकून अडविले पाणी
बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज; बॅकवॉटरमुळे रस्त्यावर व शेतात येणार पाणी
राजुरा : कोरपना-राजुरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदगाव (सूर्या) ते जैतापूर रस्त्यावर रस्ता बांधकाम करताना शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी या ठिकाणी मोरीचे (लहान पूल) बांधकाम करण्यात आले. मागील पंचवीस वर्षांपासून उंच भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी मोरीतून निघून रस्त्याच्या बाजूने जात होते मात्र नुकतेच मोरीलगत असलेले शेतकरी रघुनाथ येलमुले यांनी मोरीच्या सिमेंट पाईप मध्ये दगड माती भरून मोरीतुन येणारे पाणी बंद केल्याने पावसाळ्यात बॅकवॉटर चा फटका परिसरातील शेतपिकांना बसणार व रस्त्यावरून पाणी गेल्याने रस्त्याचे सुद्धा नुकसान होणार असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यावर कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शासनाने जनतेच्या सोयीसाठी नांदगाव ते जैतापूर या पाच किमी रस्त्याचे कच्चे बांधकाम मागील पंचेविस वर्षांपूर्वी केले आहे. तेव्हापासून या रस्त्याची दुरुस्तीसुद्धा झाली नाही, नांदगाव पासून एक किमी अंतरावर डॉक्टर अरविंद ठाकरे व रघुनाथ येलमुले यांच्या शेताच्या मधातून गेलेल्या रस्त्यावर मोरीचे बांधकाम झाले आहे. ठाकरे यांच्या शेताकडे उंच भागावरून येणारे पाणी मोरीतून येलमुले यांच्या शेताच्या बांध्यालगत रोडच्या कडेने निघून जात होते मात्र येलमुले यांनी पाण्याचा प्रवाह रोखल्याने हे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता बंद होणार व लगतच्या शेतात पाणी जाऊन शेतपिकाचे नुकसान होणार आहे. याच मोरीच्या मधोमध मोठे भगदाड पडल्याने त्या भागदाडातून पाणी रस्त्यावर येणार व रस्ता जलमय व चिखलमय होऊन केव्हाही दुर्घटना घडू शकतात यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
काही महिन्यांपूर्वी आमदार साहेबांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत या रस्ताच्या बांधकामाचे भूमिपूजन केले मात्र उन्हाळा उलटून गेला तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने या रस्त्यावरील मोरीवर पडलेले मोठे भगदाड व येलमुले या शेतकऱ्याने मोरी बंद करून थांबविलेला पाण्याचा प्रवाह यामुळे या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात केव्हाही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे संबंधित विभागाने येलमुले या शेतकऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.