जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा
30 जूनपर्यंत लाभार्थी हिस्सा भरण्यास मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 9 जून : महाकृषी अभियानांतर्गत पंतप्रधान “कुसुम घटक” योजनेतून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषीपंपासाठी अनुदान देण्यात येणार आहे. महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी दिली.
राज्यात दुसऱ्या टप्प्यात 50 हजार पारेषण विरहित सौर कृषिपंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट या योजनेत दिले आहे. या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसात सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषीधारक क्षमतेनुसार 3,5 व 7.5 एचपी सौरपंप उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण वर्गवारीचा लाभार्थ्यांचे कृषीपंप किमतीच्या 10 टक्के अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा भरावयाचा आहे. विहीर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी तसेच शाश्वत पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी तसेच पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यांना या योजनेचा फायदा होणार आहे. अटल सौर कृषीपंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापी मंजूर न झालेले अर्जदार शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सौर कृषीपंप लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्याची रक्कम ऑनलाइन किंवा एन.ई.एफ.टी. ट्रान्सफर द्वारा भरणे आवश्यक आहे. एन.ई.एफ.टी.ट्रान्सफरद्वारे रक्कम भरावयाची असल्यास लाभार्थी हिस्सा भरून एन.ई.एफ.टी. ट्रान्सफर केल्याचा युटीआर नंबर नमूद असलेल्या पावतीचा फोटो कुसुम पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे.
कुसुम टप्पा-2 मध्ये ज्या लाभार्थ्यांनी तांत्रिक चूक व अन्य कारणांमुळे लाभार्थी हिस्सा दुबार व अधिक वेळेत महाऊर्जा खात्यावर जमा केला आहे, अशा लाभार्थ्यांनी हिस्सा परत करण्याबाबत महाऊर्जाच्या www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध सूचनापत्रानुसार मागणी अर्ज पाठवावा.
या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-B व www.mahaurja.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपूरच्या 07172-256008 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा domedachandrapur@mahaurja.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील पंपाचे उद्दिष्ट शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाऊर्जाचे विभागाचे महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी केले आहे.