चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या – युवकांची आरोग्य मंत्र्याकडे मागणी

0
890

चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या – युवकांची आरोग्य मंत्र्याकडे मागणी

 

 

 

गडचांदूर – दिनांक ३१ मे २०२२ ला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांच्या हस्ते राजुरा विधानसभा क्षेत्रातील नांदा, शेणगाव, विरूर स्टेशन व भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे लोकार्पण झाले असून याकरिता करण्यात आलेली पदभरती पारदर्शकपणे राबविण्यात आली नाही. त्यामुळे सर्व नियुक्त्या ह्या बाहेरच्या असल्याने त्या तात्काळ रद्द करून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी स्थानिक युवकांनी आरोग्य मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

स्थानिक उमेदवारांना आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झाल्यामुळे संधी मिळेल अशी आशा होती. मात्र नियुक्त झालेले कर्मचारी उद्घाटनाच्या दिवशीच उपस्थित दिसल्याने अनेकांची भंबेरी उडाली. ही पदभरती कधी झाली? याबाबत कोणालाही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पदभरतीची स्थानिक पातळीवर जाहिरात सुद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक पात्र युवक-युवतींमध्ये असंतोष आहे. नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये एकही स्थानिक उमेदवार नाही. याचा अर्थ राजुरा विधानसभा क्षेत्रात एकही पात्र उमेदवार नाही का? हा प्रश्न आहे. सीएससी संस्थेमार्फत ही भरती करण्यात आली आहे.

 

मात्र स्थानिक पातळीवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात न आल्याने पात्र उमेदवार अनभिज्ञ राहिले. त्यामुळे स्थानिक पात्र उमेदवार भरतीपासून वंचित राहिले. पदभरतीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याला जबाबदार असलेल्या सीएससी संस्थेवर कारवाई करावी व पदभरती रद्द करुन नव्याने जास्त खप असलेल्या नामांकित वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन अर्ज आमंत्रित करावे व चारही तालुक्यांतील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी बिबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशिष देरकर, नांदा येथील माजी सरपंच घागरु कोटनाके, अभय मुनोत, पुरूषोत्तम निब्रड, शामकांत पिंपळकर, महेश राऊत, गणेश लोंढे, सतीश जमदाडे, कल्पतरू कन्नाके, मुन्ना मासिरकर यांच्यासह इतर युवकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here