आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट
200 युनिट मोफत विजेच्या मागणीसह मतदार संघातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा
आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असुन यावेळी चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा त्यांना केली आहे. या भेटी दरम्याण चंद्रपूर मतदार संघातील विविध महत्वांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असुन चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी पुर्ण सहाकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना दिले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील विकास कामांना गती देण्यासाठी तसेच मतदार संघातील विविध महत्वाच्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील वर्षा निवास स्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी तसेच उद्योगांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा देण्याची मागणी पून्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. सदर मागणी करत असतांना ती न्यायिक कशी या बाबतही त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगतांना विज उत्पादन केंद्रामुळे होणारे प्रदूषण आणि याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम याचा दाखला दिला आहे.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये शहरातील नागरिकांनी अर्ज दाखल केले परंतु जागेच्या कायम स्वरूपी पट्यांच्या अटीमुळे अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्यात आले नाही, झोपडपट्टी अभिन्यासाची छाननी व सर्व्हेक्षणांचे काम अतिशय संत गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना स्थायी पट्टे मिळण्यास दिरंगाई होत आहे. याकडे मुख्यमंत्री यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्ष वेधले, वर्धा नदीवरील चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा बॅरेज, आमडी बॅरेज, आर्वी (धानुर) बॅरेज चे प्रकल्प लवकर पूर्ण करणे, माता महाकाली मंदिर देवस्थान परिसरात सौंदर्यीकरण विकासकामांना मंजुरी प्रदान करण्याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. पुरातन मंदिराच्या मूळ संरचनेत कुठलेही बदल न करता सदर विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे. असे असले तरी या कामाला पुरातत्व विभागाकडून अद्यापही परवानगी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सदर मंदिराचे सौंदर्यीकरण प्रकल्प पूर्णत्वास येण्यास दिरंगाई होत आहे. या करिता राज्य स्तरावरून प्रयत्न करण्यात यावा, जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संवर्धन आणि जतन करणारे हे चंद्रपूरकर आहे. असे असतानाही चंद्रपूरकरांनाच ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी अमाफ रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळेकरी मुले, सामान्य नागरिक, वन्यजीव छायाचित्रकार आपल्याच जिल्ह्यातील जगप्रसिध्द व्याघ्र प्रकल्प बघण्यापासून वंचित आहे. हि बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना सवलतीच्या दरात ताडोबा व्याघ्रप्रकल्पात प्रवेश देण्यात यावा, विदर्भाचा सर्वांगीण विकासाकरिता स्टील उद्योग क्लस्टर्स चंद्रपूर येथे विकसित करण्यात यावा, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्राकरिता वेगळे तहसील कार्यालय सुरु करण्यात यावे, चंद्रपूर मधील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरामध्ये स्मॉग टॉवर उभारणे, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज करून औषधे, रिक्त पद भरती तसेच तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात यावी, महाविद्यालयाचे उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करत सदर वैद्यकीय महाविद्यालय नागरिकांनाकरिता सुरु करण्यात यावे, चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर नॅव्हिगेशनल एड यंत्रणा व रात्रपाळीस लँडिंग सुविधेकरिता अद्यावत यंत्रणा कार्यन्वित करून विमानतळ नुतनीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून सुरु केला जाणारा मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यात सुरु करण्यात यावे आदि मागण्या यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केल्या आहे. सदर मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चाही झाली आहे.