नांदा प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण लवकरचं
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची यशस्वी शिष्टाई
रत्नाकर चटप यांचे ३१ मे पर्यंत उपोषण स्थगित
नांदा : कोरपना तालुक्यातील बहुप्रतिक्षित नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण व्हावे म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. नांदा ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. इमारत बांधकाम व पदभरती प्रक्रिया पूर्ण झालेली असूनही अद्याप लोकार्पण न झाल्याने नागरिकांत रोष आहे. श्री. रत्नाकर चटप यांनी आक्रमक भूमिका घेत आरोग्य मंत्री, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी आदिंशी पत्रव्यवहार केला. मात्र ठोस पाऊले उचलली जात नसल्याने अखेर त्यांनी १७ मे पासून बेमुदत उपोषण करण्याचे ठरविले. अखेर प्रशासनाला जाग आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लवकरात लवकर आरोग्य केंद्र लोकार्पण केले जाईल असे लेखी दिले. मात्र लोकार्पणाची नेमकी तारीख कळल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार रत्नाकर चटप यांनी केला. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेट्ठी यांचेशी अखिल भारतीय सरपंच परिषद महासचिव रत्नाकर चटप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांची बैठक पार पडली. या बैठकीत ३१ मे पर्यंत लोकार्पणाची नेमकी तारीख सांगितली जाईल व लवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरू केले जाईल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेट्टी यांनी दिली.
मंत्रालयीन स्तरावरील अधिकाऱ्यांशी वार्तालाप करून तातडीने लोकार्पण प्रस्ताव मंजूर करावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष वेधत ३१ मे पर्यंत उपोषण स्थगित करण्यास सांगितले. तूर्तास उपोषणाला स्थगिती दिली आहे. प्रशासनाने दिलेले लेखी पत्र व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर त्यानंतर बेमुदत उपोषण केले जाईल असे रत्नाकर चटप यांनी सांगितले.