नप कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांचे हाल
प्रवीण मेश्राम कोरपना
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार संघटना संघर्ष समितीच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी प्रलंबित न्याय, हक्काच्या मागणीसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह गडचांदूर नगरपरिषदेच्या समस्त कर्मचार्यांनी सुद्धा 1 मे महाराष्ट्र दिनापासून नगरपरिषदेपुढे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा संपूर्ण आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. असे असताना मात्र या आंदोलनाचा फटका बिचार्या शहरवासीयांना बसत असून सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे.कामगार आंदोलनात समाविष्ट असल्याने शहरात स्वच्छता,पाणीपुरवठा व इतर संबंधित कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या जीवघेण्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहे. मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत असून जनतेने निवडून दिलेल्या नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी याविषयी तातडीने योग्यती उपाययोजना करावी व पाण्याविना फडफडत असलेल्या शहरवासीयांना पाणीपुरवठा करून समाधानकारक दिलासा द्यावा. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांविषयी शासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्याच्या परिस्थितीत मात्र स्थानिक न.प. सत्ताधारी जनतेला पाणी पाजणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.जनतेच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्या. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व आता सत्ताधारी या समस्येवर कधी आणि कशाप्रकारे उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.