ग्रामगीतेत ग्रामोन्नतीचा मार्ग – आ. किशोर जोरगेवार
गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामजयंती विशेषांक 2022 चे विमोचन
विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या विशेषतः आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तूकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामद्वार, ग्रामविकास, स्वावलंबी, ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जिवनाचे अविभाज्य भाग बनले. आज ग्रामोन्नतीचा विचार होत असतांना ग्रामगीतेचा आधार घेणे आवश्यक आहे. ग्रामगीतेतच ग्रामोन्नतीचा खरा मार्ग असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
ग्राम जयंतीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामजयंती विशेषांक 2022 चे विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवा अधिकारी अॅड. दत्ता हजारे, उपजिल्हा सेवा अधिकारी, रत्नाकर जोगी, जिल्हा प्रचारक दादाजी नंदनवार, ग्रामगीतचार्य बंडोपंत बोडेकर, राष्ट्रीय किर्तणकार लक्ष्मण काळे महाराज, दिलीप हजारे, मुन्ना जोगी, डॉ. अनंत हजारे, सरोज चांदेकर आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार तरुन पिढी पर्यंत पोहचविण्याची गरज असून हे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अविरतपणे सुरु आहे. आजचा युवक अध्यात्माकडून दुरावला जात आहे. मात्र अशात अनेक पाल्य आपल्या मुलांना भजन किर्तणाची ओढ लावण्याचे प्रयत्न करत आहेत. आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध ठिकाणी भजन महोत्सवाचे आयोजन करत आहोत. वर्षभरात १ हजार ८ भजन मंडळांचे भजन घेण्याचा आमचा मानस आहे. विशेष म्हणजे आमच्या वतीने आयोजित भजण महोत्सवात बाल भजन मंडळेही मोठ्या प्रमाणात येत असुन मधुर आवाजात सुंदर भजणे गात आहेत. यातून बालवयात त्यांच्यावर भजन किर्तणातून सुसस्कांर होत आहे. या बाल भजन मंडळांना प्रोत्साहण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संतभक्त, कवी व समाजसुधारक होते. त्यांनी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर भ्रमंती करुन अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. त्यांनी लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी सतत अहोरात्र चिंता केली. देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहे. ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील असे त्यांचे मत होते. त्यांचे हेच विचार घराघरात पोहचविण्याचे काम नित्य नियमाने गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केल्या जात आहे. हे काम कौतुकास्पद असुन समाजोपयोगी असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमात ग्रामजयंती विशेषांक 2022 या पुस्ताकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.