सेवानिवृत्ती ही नवीन करण्याची संधी – आमदार सुभाष धोटे
कोरपना/प्रतिनिधी : सद्याच्या धडपडीच्या जीवनात नशीबवान व्यक्तींनाच सेवानिवृत्त होण्याचा बहुमान मिळतो. मात्र सेवानिवृत्तीनंतर आपले कार्य न थांबवता समाजहितासाठी नवीन काहीतरी करण्याची संधी शोधावी असे प्रतिपादन गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी केले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संस्थेंतर्गत ५ सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ३ सहायक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा संचालक डॉ. अनिल चिताडे, उपाध्यक्ष राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक विठ्ठल थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, उज्वला धोटे, शुभांगी सुभाष धोटे, मुख्याध्यापिका स्मिता चिताडे उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेतील मुख्याध्यापक शरद जोगी, पर्यवेक्षिका शोभा जीवतोडे, मुख्याध्यापक गिरिधर बोबडे, मुख्याध्यापक रमेश पाटील, मुख्याध्यापक प्रशांत उपलेंचवार, मुख्याध्यापक कृष्णा बत्तुलवार, सहायक शिक्षक पंजाब घानोडे, शालिनी किंगरे, विठ्ठल कुमरे, जेष्ठ लिपीक चंपत गोहोकार आदींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्मिता चिताडे यांनी केले तर आभार वामन टेकाम यांनी मानले. सत्कारमुर्ती पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रदीप परसुटकर, प्रशांत धाबेकर, भारती घोंगे यांनी करुन दिला. यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, पर्यवेक्षक हनुमान मस्की, एमसीव्हीसीचे विभाग प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.