राजुऱ्यात ‘अंत्योदय’ च्या रेशन कार्डातही हेराफेरी

0
816

राजुऱ्यात ‘अंत्योदय‘ च्या रेशन कार्डातही हेराफेरी

 

 

चंद्रपूर : राजुऱ्याच्या अन्न पुरवठा विभागातील मोफत धान्य वितरणातील अफरातफर समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहे. या प्रकरणात पुरवठा निरीक्षक विकाससिंह राजपूत यांच्या संपत्तीचीही चौकशी होणार असल्याने अन्नपुरवठा विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, आता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका तयार करताना हेराफेरी झाल्याचेही प्रकरण समोर आल्याने अन्न पुरवठा विभाग चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

 

राजुऱ्याच्या अन्न पुरवठा विभागात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या मोफत धान्य वितरणात विकाससिंह राजपूत यांच्या माध्यमातून कोरोनाकाळात अक्षरशः लूट करण्यात आली आहे. सोबतच अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका तयार करताना महसुली नियम धाब्यावर बसवून रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचे प्रकरणही समोर आले आहे. त्यामुळे मोफत धान्यासह अंत्योदयच्या योजनेतही मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी केला आहे. अंत्योदय योजनेतील नवीन शिधापत्रिका २०१९ नंतर तयार करण्यासाठी प्रतिबंध आहे. असे असताना राजुऱ्यात कोणतेही कागदपत्र न जोडता अंत्योदयचे कार्ड तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

 

राजुऱ्यात केशरी कार्डधारकांना २ किलो तांदूळ व तीन किलो गहू वाटप करण्यात येते. मात्र, अन्न पुरवठा निरीक्षक राजपूत यांनी शिधापत्रिकांचे रुपांतर अंत्योदयमध्ये करून धान्य वितरणाचा मोठा घोळ केल्याची माहिती आहे. मुळात अंत्योदयचे कार्ड एचआयव्ही व कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिले जाते. तसा शासन निर्णयही आहे. पण, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अंत्योदयच्या कार्डाची खैरात वाटल्याची माहिती आहे. विशेषतः दुकानदारांनी अधिकाऱ्यांच्या सहमतीने हे कार्ड तयार केले असले तरी त्यांना ३५ किलो धान्य दिले नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. राजुरा तालुक्यात १०८ रास्तभाव दुकानदारांकडून धान्य वितरित केले जात असून, सध्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत धान्यातील गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. या आरोपामुळे अन्नपुरवठा विभागात खळबळ माजली असतानाच अंत्योदयच्या कार्डाचाही मोठा गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

राजुऱ्यातील अन्न पुरवठा विभागातील या गैरप्रकाराची सूरज ठाकरे व सादिक काझी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (पुरवठा) यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, मोफत धान्य व अंत्योदयमधील गैरप्रकारामुळे पुरवठा निरीक्षक पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

 

चौकशीला विलंब
“राजुऱ्याच्या अन्न पुरवठा निरीक्षक विकाससिंह राजपूत यांच्या गैरप्रकाराबाबत काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यातच उपायुक्त (पुरवठा) यांच्याकडून चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. परंतु, जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी यांनी जाणीवपूर्वक या चौकशीला विलंब केला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी फाइल टाकल्याचे कारण त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, अन्न पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे एकमेकांसोबत लागेबांधे असल्यानेच चौकशीला विलंब होत असल्याचीही चर्चा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here