माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे मा. महापौरांद्वारे उदघाटन
चंद्रपूर १८ सप्टेंबर – कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाद्वारे ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘ ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा चंद्रपूर शहरासाठी शुभारंभ मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते आज १८ सप्टेंबर रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात करण्यात आला. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरात आरोग्य पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
माझे कुंटूब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती देतांना मा. महापौर म्हणाल्या की, देशातील व राज्यातील कोविड बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रक, ट्रिक या त्रिसुत्रीचा वापर करुन कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. याचकरिता शासनाने माझे कुंटूब माझी जबाबदारी ही कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिम राबविण्याचे धोरण निश्चित केले असुन त्यांची अंमलबजावणी चंद्रपुर शहरातही होणार आहे. याकरिता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता महानगरपालिकेने १११ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांना नागरीकांनी संपुर्ण आरोग्य विषयक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
शहरात संशयित व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे यामध्ये अति जोखमीची व्यक्ती जसे, की उच्च रक्तदाब, मधुमेह, फुप्फूसाचे अथवा हृदयाचे आजार असलेले व्यक्ती, गरोदर महिला इत्यादींना उपचार देणे. कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे. तसेच सारी किंवा आयएलआय रुग्णाचे गृह भेटीद्वारे सर्वेक्षण करणे, कोविड-19 तपासणी व उपचार करणे तसेच गृह भेटीद्वारे प्रत्येक नागरिकांना कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
शहरातील शासकीय व खाजगी रूग्णालयातील जनरल बेड, आय.सी.यु बेड व व्हेटीलेंटर बेड, यांची उपलब्धता नागरिकांना व्हावी याकरिता महापालिकेने
ccmcchandrapur.com/hospital ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.यामुळे नागरिकांना कोणत्याही क्षणी उपलब्ध खाटांची संख्या व रूग्णालयाची नाव उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
यावेळी उपमहापौर तथा सभापती स्थायी समिती राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, योजनेचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार,शहर अभियंता महेश बारई, मनोज गोस्वामी ,महापालिकेचे मुख्य वैद्यकियअधिकारी डॉ. आविष्कार खंडारे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.