“OBC” च्या खच्चीकरणासाठीच त्यांची जातवार जनगणना नाकारली आहे – भूषण फुसे
“60 टक्के संख्येनी असलेल्या ‘OBC’ समूहाचं राजकीय आरक्षण ‘इम्पिरिकल डाटा’ नसल्याने रद्द करण्यात आलं. उद्या याच आधारावर त्यांचं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण संपविल्या जाईल. म्हणून obc ची जातवार जनगणना नाकारणे हे त्यांचे खच्चीकरण आहे” असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा तडफदार ओबीसी नेते भूषण फुसे यांनी केले आहे. लाठी येथील फुले – आंबेडकर जयंती महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते समारोपीय सभेला मार्गदर्शन करीत होते.
बंडू नगराळे यांचे अध्यक्षतेखालील या सभेला प्रमुख अतिथी म्हणून आनंद अंगलवार, महादेवराव कातकर, ए. एम. सारवे हे मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना फुसे म्हणाले की obc चे खच्चीकरण ही दलित, आदिवासी यांचेसाठीही धोक्याची घंटा आहे. ज्या पद्धतीने 60 टक्के असूनही एका झटक्यात obc चे राजकीय आरक्षण संपविण्यात आले. तेव्हा अल्पसंख्यांक, दलित, आदिवासींचे आरक्षण संपविण्यास मनुवाद्यांना वेळ लागणार नाही. म्हणून दलित, आदिवासी, obc या बहुजनांनी एकत्रित होऊन मनुवाद्यांचे मनसुबे उधळले पाहिजे.
सदर सभेपुर्वी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी SSD च्या पथसंचालनात भीमजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. चार दिवसीय या महोत्सवात दिनांक 13 एप्रिलला WF मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी दिलीप वावरे, सुरेश नारनवरे यांचे हस्ते विविध क्षेत्रातील 40 मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
याच सोहळ्यात प्रसिद्ध नाटककार, नकलाकार लक्ष्मण कडुकर यांना गावकऱ्यांतर्फे ‘बहुजन प्रबोधनकार’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. सूत्र संचालन डॉ. कैलाश नगराळे, सुरेश नगराळे व प्रास्ताविक पंकज ताळे तर आभार व्यक्त मुरलीधर ठेंगरे यांनी केले. चार दिवसीय या भव्य सोहळ्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.