तब्बल ४२ वर्षांनी भेटले वर्ग मित्र व मैत्रिणी…
ब्राह्मणवाडा सह्याद्री विद्यालयात पार पडला स्नेह मेळावा..
अहमदनगर
संगमनेर १७/४/२०२२
(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
बालपण ते आताचे झुकलेले म्हातारपण याचे आकलन करून, सन १९८० सालचे एस एस सी चे विद्यार्थी तब्बल ४२ वर्षांनी एकत्र आल्याने ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालय मध्ये आनंद मेळा भरल्याचे भावनिक चित्र काल निर्माण झाले होते.
मार्च १९८० साली या विद्यालयातून ३५ विध्यार्थी एस एस सी पास झाले. यात मुलींची संख्या ही ७ होती. ब्राह्मणवाडा गाव म्हणजे भाऊसाहेब हांडे, या सहकार महर्षी यांचे गाव, गावात १९५६ साली बाबा नाईकवाडी यांच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, व सह्याद्री विद्यालय ब्राह्मण वाडा शाळेची निर्मिती झाली. तत्कालीन सरपंच एल बी आरोटे , देवराम गायकर, भिमाजी आरोटे , उमाजी गायकर, सखाराम गायकर यांनी कष्ट घेऊन मुंबईकर , पुणेकर येथील माजी विद्यार्थी , देणगीदार , गाव वर्गणी करून शाळेची इमारत उभी केली. पुढे पाचवी चा ही वर्ग ८०च्या दशकात चालू झाला. माध्यमिक विद्यालय ने आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जाऊ लागली. पंचक्रोशीत शाळाच नव्हती , गावातील मुले सातवी नंतर शेती करत किंवा ओतूर येथे शिक्षणास जात. रोज १२ किमी पायी ओतूर ला पायी जाणारे व शिक्षण घेणारे अनेक वृध्द आज ही गावात आहेत. अश्या बिकट स्थितीत गावाने भाऊसाहेब हांडे व बाबा नाईकवाडी यांच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. आज कॉलेज ही गावात आहे.
मार्च १९८० चे अनेक विध्यार्थी आज विविध पदांवर काम करत आहेत. काही शेती करतात तर काही धंदा व्यवसाय. यांना एकत्र आणायचे व शिक्षकांना ही एकत्र आण्याची कल्पना ज्ञानदेव गायकर (वरिष्ठ दूरसंचार अधिकारी) व भारत जाधव मुख्याध्यापक चास विद्यालय या दोन माजी विद्यार्थ्यांनी मांडली व प्रत्यक्षात साकार ही झाली. या कार्यक्रमास सर्व तत्कालीन विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरवात स्वागत गितानी करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन वर्ग शिक्षक जनार्दन वाकचौरे यांनी भूषवले.
विध्यार्थी कसा घडवला जातो याचे मार्मिक विवेचन शांताराम बंगाळ यांनी केले. कष्ट आणि जिद्द या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असून, मला माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले. लवकरच महा मेळावा आयोजित करा, असे आवाहन ही त्यांनी करून महा मेळावा संकलपना ही विषेद केली.
आपल्या भाविक भाषणात तुकाराम उगले सर यांनी अनेक जुन्या बाबींना उजाळा देऊन , विद्यार्थी आम्ही कसे घडवत होतो या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी घडवताना एक गुणी शिक्षक ही घडत असतो. प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन मोठी झालेली माझे विध्यार्थी माझा स्वाभिमान आहे . मी कुठ ही जातो तेव्हा माझा विद्यार्थी आमचा आदर करतात , हीच आमची समाधानाची बाब आहे असे ही ते म्हणाले. गावातील शाळा कशी झाली याचा , मागोवा घेऊन त्यांनी गीते सर व खणकर सर यांच्या स्मृतीस उजाळा दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात वाकचौरे सर यांनी अनेक जुन्या आठवणी ना उजाळा दिला. ब्राह्मणवाडा गावाने दिलेले प्रेम हे मीच काय पण माझा परिवार कधी ही विसरणार नाही . या शाळेने मार्च १९८० ची बॅच फार मोठी दिली याचा उल्लेख करून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला.
कार्यक्रमात सुरवातीला ज्ञानदेव गायकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला , संभाजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर रोहिदास आरोटे यांनी आभार मानले. या प्रसंगी ,डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब गायकर, वैज्ञानिक दगडु गायकर, प्रगतशील शेतकरी गोकुळ गायकर, सुहास जाधव, रोहिदास आरोटे, जी. प.शिक्षक रामदास शिंदे, पुणे येथील प्रसिद्ध योगा मार्गदर्शक व उद्दोजक सौ वंदना भोर आरोटे, मुंबई महानगर चे अधिकारी दिलीप गायकर, दूरसंचार चे माजी अधिकारी ज्ञानदेव गायकर , भरत जाधव यांची ही भाषणे व मनोगत व्यक्त केली. व्यासपीठावर भगवंतराव पाबळे, भीमाजी आरोटे, बाबुराव गायकर, दिलीप गायकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी सहपरिवार उपस्थितीत होते. तब्बल ४२ वर्षांनी भेटल्याने सर्व विद्यार्थी आनंदी दिसत होते.