अन्नपुरवठा निरीक्षकांचे तात्काळ निलंबन करण्याची सूरज ठाकरे यांची मागणी…
राजुरा तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात मोठा घोळ
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा निरीक्षक पदी विकास राजपूत गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत. कोव्हिडं – १९ काळात केंद्र शासनाकडून मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले. या धान्याची मोठी अफरातफर करून राजपूत यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. हि गंभीर बाब सर्वत्र माहिती असून याबाबत अनेक तक्रारी आहेत. राजपूत यांच्या कार्यप्रणालीत मोठा घोळ असून याचे अनेक पुरावे व साक्षीदार आहेत. मात्र प्रशासन अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केला असून संबंधित अधिकारी राजपूत यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेच्या वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. काही स्वस्त धान्य दुकानदारांना हाताशी धरून सदर अधिकाऱ्यांनी संगनमताने तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानातील मोफत धान्याची परस्पर विल्हेवाट लावून मोठी आर्थिक माया जमविली आहे. तसेच ‘अंत्योदय’ कार्डधारकांत ज्यांना लाभ मिळायला हवा त्यांना लाभ न देता ज्यांना आवश्यकता नाही अशांना लाभ देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करून वाममार्गाने बरीच आर्थिक माया जमविली असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येऊन सुद्धा प्रशासनाकडून अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याने प्रशासन मेहेरबान का…? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
“बदली २०२१ मध्ये झाली असून पत्नी गरोदर असल्याचे कारण सांगून थांबविण्यात आली. पण अजून त्यांना मुल झाले नाही का…? त्यामुळे शासनाची वारंवार फसवणूक हा भ्रष्टाचारी माणूस करतो आहे, हे स्पष्ट झाले आहे. शिवाय केंद्रशासनाने पाठविलेली डाळ ही फक्त १४ दुकानदारांच्या नावे देण्यात आल्याची नोंद आहे. परंतु त्या १४ दुकानदारांना या बाबत माहीत देखील नाही. हा प्रकार एखाद्या डकेती पेक्षा कमी नाही असे ठाकरे यांनी सांगितले.”
संबंधित अधिकाऱ्याने नुकतेच १६ लाख रुपयांची रोख स्वरूपात चार चाकी वाहन खरेदी केले आहे. त्यामुळे रोख वाहन खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम आली कोठून याची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह चौकशी करण्यात यावी. सदर अधिकाऱ्याने सामान्य माणसाच्या धान्यावर डल्ला मारून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून तुरुंगात डांबून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर, आयकर विभाग नागपूरचे मुख्य आयुक्त व आयकर विभाग चंद्रपूरचे आयुक्त यांनाही प्रतिलिपीत सादर केले आहे.
सूरज ठाकरे यांनी पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणला असून प्रशासन पांघरून टाकत असल्याने प्रशासनावरही ताशेरे ओढले आहेत. हि मोठी गंभीर बाब असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्व स्तरातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.