वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापन दिन सोहळा संपन्न…
वंचित बहुजन आघाडी,चंद्रपूर च्या वतीने वतीने पक्षाचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने कार्यकर्ता मेळाव्याच्या स्वरूपात प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,चंद्रपूर येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन माननीय राजेशजी बोरकर, चंद्रपूर जिल्हा प्रभारी यांच्या शुभहस्ते पार पडले.
आपल्या उद्घाटनीय मार्गदर्शनाद्वारा मान.बोरकर यांनी मागील तीन वर्षात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आलेल्या विविध सामाजिक व राजकीय आंदोलनाची माहिती विषद करून येणाऱ्या काळात वंचित बहुजन समाजाच्या हातात सत्तेची चावी कशी प्राप्त करावी यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे असे सुचविले. पूर्व विदर्भाचे मुख्य संयोजक मान. रमेशजी गजबे, माजी राज्यमंत्री यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांनी आजपासूनच वंचित बहुजन आघाडी च्या जाहीरनाम्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सत्ता हस्तगत करण्याच्या दिशेने आगेकूच करण्याचे सुचविले. या मेळाव्याला मार्गदर्शनासाठी म्हणून लाभलेले मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य सदस्य माननीय कुशल भाऊ मेश्राम, विदर्भ समन्वयक मान. अरविंदभाऊ सांदेकर ,मान. राजूभाऊ झोडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून असे संबोधले की, कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीची चळवळ जिल्ह्यातील प्रत्येक घरात पोहोचविण्यास आजपासूनच कार्यरत होऊन येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता प्रस्थापित करण्याचा विडा उचलावा व वंचित बहुजन समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना चंद्रपूर महानगरचे महासचिव प्रा.नितीन रामटेके यांनी उपस्थितांसमोर कार्यकर्ता मेळाव्याची पार्श्वभूमी प्रतिपादित करून वंचित बहुजन आघाडी ने आजपावेतो केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मान. भूषणभाऊ फुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याला संबोधन करताना मा.भूषणभाऊ फुसे यांनी वंचित बहुजन आघाडी आगामी काळात सत्तासंपादनाकडे आगेकूच करीत असल्याचे सूचित करून येणारा काळ हा वंचित बहुजनाचा राहणार असल्याचे प्रतिपादित केले.
या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी चंद्रपूरमधील ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ मान.डाॅ.शरयू पाझारे व माजी जिल्हाध्यक्ष मा.डाॅ.प्रविण गावतुरे यांचा पक्षाचे आजीवन सभासद झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंचावर महानगर अध्यक्ष मा.बंडूभाऊ ठेंगरे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मान.कविताताई गौरकार, महिला आघाडी चंद्रपूर महानगरच्या अध्यक्षा मान.तनुजाताई गौरकार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष मान.सिद्धार्थ शेंडे,युवक आघाडी महानगर अध्यक्ष मान.संदिप देव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मान.धिरज तेलंग ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
“तुफानातले दिवे” या अजय-चेतन प्रस्तुत सांस्कृतिक जलसा चे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रपूर महानगर चे प्रवक्ता मान.रामजीभाऊ जूनघरे ह्यांनी केले तर उपस्थितांचे आभार मान.निशाताई ठेंगरे ह्यांनी मानले. या मेळाव्याला चंद्रपूर जिल्ह्य़ातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.