पिपर्डा येथे छोटा शिक्षक उपक्रम !
विकास खोब्रागडे
चंद्रपूर । संपूर्ण जगात कोविड -19 या आजाराने थैमान घातले. त्यामुळे अनेक क्षेत्र प्रभावित झाली.यामध्ये शिक्षण क्षेत्र सुद्धा अपवाद होऊ शकले नाही. इतर क्षेत्रावर झालेला प्रभाव जाणवू लागला. तेव्हा गावातील मुलांची होणारी शैक्षणिक हानी रोखता येऊ शकते ही कल्पना पालकांच्या लक्षात आणून देण्यात आली . पालकांनी सुद्धा सकारात्मक पाठिंबा दिला आणि गावात सुरू झाला एक अनोखा उपक्रम छोटा शिक्षक गावातील सुक्षित स्वयंसेवकांच्या पुढाकारातून लहान मुलांना शिकवू शकता, तुम्हाला यासारख्या बाबी समजावून सांगण्यात आल्या. त्यातूनच हा उपक्रम सुरू झाला. त्यासाठी गावातील ‘धम्मपाल बौद्ध विहार’ या जागेची निवड करण्यात आली. पालकांशी चर्चा करून साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे व विशिष्ट अंतर राखणे या बाबी समजावून सांगण्यात आल्या. प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यापूर्वी मुलांचा भाषा आणि गणिताचा शैक्षणिक स्तर निश्चित करण्यात आला. रोज सकाळी वर्ग चालतात. मुलांना शिक्षणासोबतच चांगल्या सवयी सुद्धा लावल्या जात आहेत.ज्यात सरळ रांगेत बसायला लावणे,ताठ बसणे, डोळे मिटने,शांतपणे प्रार्थना ऐकणे याशिवाय घरी रांगेत जाणे यासारख्या सवयी आता मुलांमध्ये रुजलेल्या दिसत आहेत.वर्गाची सांगता ‘ हीच आमुची प्रार्थना ‘या गीताने केली जाते. सदर उपक्रम ‘प्रथम एज्युकेशन फॉउंडेशन’ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला असून त्यासाठी योगेश खोब्रागडे, घनश्याम खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात प्रणाली अरुण भेंडारे, समीक्षा अनिल मेश्राम आणि स्नेहल ज्ञानेश्वर मेश्राम हे शालेय विद्यार्थी छोटा शिक्षकाची भूमिका निभावत आहेत. तसेच प्रशांत गजभिये आणि मनोज खोब्रागडे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करीत आहेत.