एन्जॉय करत अभ्यास करा – आशिष बोरकर
स्पर्धा परीक्षेच्या युवकांशी साधला संवाद
सावली : अभ्यासाचे मोठे बर्डन आहे, असा विचार न करता, विशिष्ट ध्येय ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने एन्जॅाय करत अभ्यास करा, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल, असा यशाचा मूलमंत्र सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. गुरुवारी त्यांनी सावली येथील जयभीम वाचनालयात सदिच्छा भेट देऊन, अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तथा जयभीम वाचनालयाच्या अध्यक्ष लता लाकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नितेश रस्से, ‘लोकमत’चे उपसंपादक परिमल डोहणे आदी उपस्थित होते. यावेळी जयभीम वाचनालयाच्या वतीने ठाणेदार आशिष बोरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ठाणेदार बोरकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, वेळेचे नियोजन कसे करायचे, नोट्स कशा काढायचे, याबाबत मार्गदर्शन करताना, विशिष्ट ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न करा, अभ्यासात कोणतीही अडचण आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वाचनालयातील ग्रंथसाठा बघून, तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी गाठलेली उंची ऐकूण ठाणेदारांनी वाचनालयाचे कौतुक केले, तसेच स्वत:ही स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशी मासिके पुरविण्याचे आश्वासन दिले.
नगराध्यक्षा लता लाकडे यांनी अपयश आले तर खचू नका, जिद्दीने अभ्यास करा, यश नक्कीच मिळेल, असे मार्गदर्शन केले. संचालन प्रद्युत डोहणे यांनी केले. कार्यक्रमाला वाचनालयाचे ग्रंथपाल डिलक्स डोहणे, पुष्पकांत डोंगरे, लोकेश बोरकर, दुधाराम गेडाम यासोबतच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत होती.
आज स्पर्धा मार्गदर्शन शिबिर
राष्ट्रपिता म. गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली अंतर्गत करिअर गाइड्स व प्लेसमेंट सेंटर, पोलीस स्टेशन सावली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राष्ट्रपिता म. गांधी महाविद्यालय येथे शनिवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.चंद्रमौली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अभिनव सिंह उपस्थित राहणार आहे. शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.