जिल्हा पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जनावर तस्कर सैराट…
राजुरा/चंद्रपूर : सध्या जनावर तस्कर बरेच सैराट झाल्याचे निदर्शनास येत आहे. मागील दोन तीन महिण्याअगोदर जिल्हा पोलीस प्रशासनाने गोवंशीय जनावर तस्करांवर कारवाया धडक सत्र राबवित कारवाईचा धडाका चालविला होता. मात्र दोन तीन महिन्यानंतर या जनावर तस्करांनी डोके वर काढले असून सध्या या तस्करांनी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तस्करीचा गोरखधंदा सुरू केला आहे. यामुळे या तस्करांच्या मुसक्या आवळून कडक कारवाईचे मोठे आव्हान जिल्हा पोलिस प्रशासनापुढे आहे.
कारवाईच्या धाडसत्राने धडकी भरलेल्या तस्करांनी पोलिस प्रशासनाला हुलकावणी देत नव्याने आपले नेटवर्क सक्रिय केल्याचे दिसून येत आहे. या जनावर तस्करीत काही मातब्बर तस्करांनी आपला चांगलाच जम बसविला असल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार गडचिरोली, भंडारा व गोंदिया तसेच मध्यप्रदेशातून जनावरांची तस्करी करून कत्तलीसाठी चार चाकी आयशर वाहनाने तेलंगणात पाठविली जात आहेत. मात्र यावर कारवाई होताना दिसून येत नसल्याने या तस्करांचे मनसुबे चांगलेच बुलंद झाल्याचे दिसून येत आहे.
पोंभुरणा तालुक्यातील उमरी पोतदार, कोठारी, तोहोगाव व विरुर स्टेशन पोलिस ठाणे हद्दीतून बिनबोभाटपणे आयशर वाहनाने निर्दयतेने जनावरांना कोंबून वाहतूक केली जात असताना स्थानिक पोलिसांना याची भनक नसल्याने हे सामान्य जनतेला न उलगडणारे कोडे आहे. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तस्करांसोबत आलेल्या मधुर संबंधातून स्थानिक पोलीस कारवाई करत नाही का…? हा यक्ष प्रश्न ऐरणीवर आल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने या मातब्बर तस्करांच्या मुसक्या आवळून मुक्या निष्पाप जीवांना जीवनदान देण्याची मागणी गोप्रेमी करत आहेत.