वंचित आघाडी हा सर्व जातीचा पक्ष आहे – अँड. फुसे
सावली तालुका प्रतिनिधी काँग्रेस व भाजपा मनुवादी पक्ष असून ओबीसीचे आरक्षण नष्ट करण्याचा डाव या दोन्ही पक्षाने आखला आहे. वंचित बहुजन आघाडी हा कोण्या एका जातीचा पक्ष नसून सर्व जातीच्या लोकांचा पक्ष आहे. सर्व समाजाला घेऊन या चळवळीत सन्मानाने सहभागी करून सोबत घ्यावे लागेल असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड भूषण फुसे यांनी वंचित बहुजन आघाडी तालुका सावली च्या वतीने आयोजित तालुका कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गावतुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर वानखेडे, जिल्हा सचिव मधुकर उराडे, तालुका निरीक्षक दिलीप वाळके, ज्येष्ठ कार्यकर्ता ए. आर. दुधे, के. एन. बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. अँड फुसे पुढे म्हणाले की, ओबीसीसाठी महामानव डॉ. बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अँड. बाळासाहेब आंबेडकर ओबीसींचे प्रश्न घेऊन मोर्चे, आंदोलने करीत आहेत. बाळासाहेबाचे आंदोलन व मोर्चे संविधानिक असल्याने मनुवादी काँग्रेससह भाजपाला अडचणीचे जात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे खच्चीकरण करण्याचा डाव या मनुवादी पक्षाने आखला आहे. जर जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली तर अकोला पॅटर्न राबवून शेतकऱ्यांना मोफत बी-बीयाणे चे वाटप करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी बुथ कमिटी तयार करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जोमाने लढवा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी युक्रेन येथे शहीद झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव विलास माहोरकर यांनी केले. संचालन शहराध्यक्ष रोशन बोरकर तर सपना दुधे यांनी आभार मानले.