नांदा येथील सरकारी जागेवरील ‘ ते’ बेकायदेशीर बांधकाम पाडा
मनसेचे प्रकाश बोरकर यांची मागणी
अल्लाउद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात कारवाईची मागणी
नांदा : सध्या नांदा गाव हे वेगवेगळ्या बेकायदेशीर बांधकामाने चर्चेत येत आहे. आता तर सरास सरकारी जागेवर
अल्लाउद्दीन शमशुद्दिन सिद्दीकी यांनी बांधकाम सुरू केले असल्याचे मनसेचे बोरकर यांनी म्हटले आहे. नांदा ग्रामपंचायत हद्दीतील ५ ते ६ गुंठे जागेवर सदर व्यक्तीने अतिक्रमण केले असून याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे प्रकाश बोरकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणेदार पो.स्टे. गडचांदूर यांचेकडे लेखी तक्रारीतून केली आहे. मागील २ महिन्यापासून त्या वादग्रस्त जागेवर पिलर पर्यंतचे पक्के बांधकाम सुरू केले असून सार्वजनिक वापराच्या शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण पाडणे गरजेचे असल्याचे मत बोरकर यांनी मांडले.
नांदा गावालगत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे त्यामुळे गावात नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. विशेष म्हणजे सदरचे वादग्रस्त बांधकाम गडचांदूर – अंतरगाव मार्गावर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे बेकायदेशिर बांधकाम तोडण्याचा नोटीस दिला असल्याची माहिती बोरकर यांनी दिली. शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण बेकायदेशीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता, प्रशासन नेमकी काय कारवाई करेल याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.