साठ लाखाच्या रस्त्यावर दहा लाखाची “बूट पालिश”
●निकृष्ट कामाची मालिका ●अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
कोठारी, राज जुनघरे
कोठारी बस स्थानक ते कवडजई कडे जाणाऱ्या गावातील मुख्य रस्त्यासाठी शासनाने सात वर्षांपूर्वी साठ लाख रुपये खर्च केले आता त्याच रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयाचे बुटपालिश करण्याचे निकृष्ट काम सुरू आहे.
२०१५-१६ मध्ये खनिज विकास निधी अंतर्गत व २५/१५ वित्त योजनेतून कोठारी गावातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम अंदाजे ५० ते ६० लक्ष रुपयाचा निधी खर्च करून करण्यात आले. सदर बांधकाम होऊन केवळ सात वर्षाचा कालावधी लोटला असून या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निकटचे व राजकीय नामांकित ठेकेदाराने केले होते. सात वर्षात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले.या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, सायकल व बैलबंडी सोडाच पायदळ जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असे. या रस्त्यावर अनेक अपघात घडले. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून यातून स्वताची झोळी भरली. सोबत ज्या विभागाच्या अंतर्गत काम करण्यात आले त्या अधिकाऱ्यांना व गावातील कारभारी यांनाही भरपूर मलई वाटप करून गावकर्यांच्या नशिबी निकृष्ट रस्ता मारत मरणयातनेत सोडून दिले.
सदर रस्त्याची गंभीर परिस्थिती व गावकर्यांना होणाऱ्या वेदना पाहून विनोद बुटले यांनी यावर डागडुजी करण्यासाठी खा. बाळू धानोरकर यांचेकडे निधीची मागणी केली. खासदाराने खनिज विकास निधी अंतर्गत दहा लक्ष मंजूर केले. सद्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग बल्लारपूर यांचे देखरेखेखाली रस्त्यावर असलेल्या खड्याची डागडुजी सुरू असून त्याचे काम कोठारीतील ठेकेदार करीत आहेत. सुरू असलेल्या कामावर जबाबदार अधिकारी, कर्मचारी एकही दिवस हजर नसून त्यांचे गैरहजेरीत रस्त्याचे बुतपालिश सुरू आहे. किमान खड्डे तरी चांगले भरावे व भविष्यात गावकऱ्यांच्या यातना कमी व्हाव्यात ही गावकऱ्यांची भूमिका आहे. सद्या सुरू असलेले काम अंदाज पत्रकाप्रमाणे उत्तम साहित्य वापरून करावे ही गावकऱ्यांची मार्मिक मागणी आहे. रास्ता तयार झाल्यानंतर किती कालावधी नंतर उखळणार ही येणारी वेळच ठरविणार आहे.