उर्जानगर येथील पट्टेदार वाघांना जेरबंद करा – नितीन भटारकर यांची संपर्कमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी
प्रकल्पातील कर्मचारी, वसाहतीतील व सभोवतालच्या गावातील नागरीकांचा जीव धोक्यात असल्याची गंभीर दखल संपर्कमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी घेतली
चंद्रपूर जिल्हा प्रशासन, वन विभाग व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व्यवस्थापन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्कमंत्री तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार संयुक्त बैठक
चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील वसाहत व प्रकल्पातील सुरक्षा भिंतीच्या आत मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून अनेक वाघीनींने छोट्या शावकांना येथे जन्म दिलेला आहे. यामुळे कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
ऊर्जानगर येथे वाघ, बिबट व अस्वल यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून मागील काही कालावधीपासून सदर प्राण्यांनी हिंसक रूप घेतले असल्याने पुढील काही कालावधीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
काही कालावधी पूर्वी याच वसाहतीतील आई सोबत फिरणार्या एका ५ वर्षाच्या मुलीला आई देखत बिबट्याने उचलून जंगलात नेऊन ठार केले. तसेच वसाहतीतील व्हीआयपी गेस्ट हाऊसच्या आवारात असलेल्या वाघीनीने दुचाकीस्वार कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता, मात्र सोबत असलेल्या इतर कामगारांनी आरडाओरड केल्याने सदर कर्मचारी बचावला मात्र गंभीर जखमी झाला होता.
सदरच्या आवारात पूर्वीच्या काही कालावधी पर्यंत वाघ, बिबट्या व अस्वल हे फक्त रात्रीच्या वेळी दिसत होते, आता मात्र दिवसाढवळ्या प्रकल्पाच्या आवारात हिंस्र रूप घेत वाघ फिरत आहे. दररोज वाघांचे व्हिडिओ व्हायरल होत असून दुचाकीवर जाणाऱ्या कामगारांवर हल्ला करण्याच्या दृष्टीने धावून जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
यापूर्वी देखील या हिंस्र प्राण्यांना जेरबंद करा या मागणी करिता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली असता त्यांनी आपली जबाबदारी झटकत सदर क्षेत्र चं. म. औ. वि. केंद्राचे खाजगी क्षेत्र असून कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही वनविभागाची नाही, ही जबाबदारी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व्यवस्थापनाची आहे असे उत्तर दिले.
वन विभाग चंद्रपूर व विज केंद्र व्यवस्थापन यांच्यात या विषयावर मतभेद आहेत. यामुळे प्रकल्पात दिवसरात्र काम करणाऱ्या जवळपास ५ हजार कामगारांसह वसाहतीतील व सभोतालच्या गावातील नागरीकांचा जीव मात्र धोक्यात आलेला आहे.
५ वर्षाच्या मुलीचा जीव गेल्यानंतरही वन विभाग सदर बाब गांभीर्याने घेत नसेल तर यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी शोकांतिका नाही. व म्हणुन पुढील काळात देखील एखाद्या कामगारावर किंवा गावातील नागरिकांवर वाघ हल्ला करू शकते, याची गंभीर दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्हा संपर्क मंत्री मा.ना.श्री. प्राजक्त तनपुरे यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ ला मा. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, येथे जिल्हा प्रशासन, वन विभाग व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांची संयुक्त बैठक ठेवलेली आहे.
प्रकल्पातील कर्मचारी, वसाहतीतील व सभोवतालच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने या विषयाची गंभीर दखल ऊर्जा राज्यमंत्री मा. तनपुरे यांच्यातर्फे घेण्यात आल्याबद्दल कर्मचारी व नागरिकांनी आभार मानले.