हाय व्होल्टेज तारांचे शॉक लागून मृत्यु झालेल्या व अपंग झालेल्यांना आर्थिक मोबदल्यासाठी उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन
कोरपना प्रतिनिधी
गडचांदुर: येथील प्रभाग क्रमांक १ मधून जाणाऱ्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारा अनेक नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत आहे.
हया राजुरा फिडर 33000 हाय व्होल्टेज च्या विद्युत तारा बऱ्याच लोकांच्या घरावरून गेलेल्या आहेत तर काही लोकांच्या प्रत्यक्ष घराच्या आत या हाय व्होल्टेज तारांचे विद्युत खांब स्थापित आहेत.
ह्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे.
सदर हाय व्होल्टेज तारांना नकळत स्पर्श होऊन बऱ्याच लोकांना आपले जिवन गमवावे लागले आहेत तर बऱ्याचश्या लोकांची वित्त हानी झालेली आहे.
मागील डिसेंबर महिन्यात पेंटिंग चे काम करत असलेल्या अवी पोचू रामटेके ह्या गरीब कुटुंबातील व्यक्तीचा हाय व्होल्टेज विद्युत तारांचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला.
तर आठ महिन्यांची गर्भवती पल्लवी शुभम पेंढारकर ह्या महिलेला शॉक लागल्यामुळे आपला हात गमवावा लागला एकदा नव्हे तर दोन वेळा सदर महिलेला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
सदर दुर्दैवी घटना घडलेल्या लोकांनी माहितीच्या अभावामुळे तसेच आपल्या आप्त जणांच्या उपचारामध्ये वेळ घालविला व वेळ परिस्थिती नुसार तसे करणे गरजेचेही होते. परंतु या सर्व कारणांमुळे सदर दुर्घटना घडलेल्या लोकांनी किंवा त्यांच्या आप्तजणांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने ठरविलेल्या नियमानुसार नियोजित वेळेत मोबदल्याची मंडळाकडे निवेदन सादर केले नाही. ही बाब प्रभागांतील काही लोकांच्या लक्षात आली व त्यांनी सदर दुर्घटना घडलेल्या लोकांना आर्थिक मोबदला मिळावा या हेतूने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा गडचांदुर चे उप कार्यकारी अभियंता इंदुरिकर साहेब, कार्यकारी अभियंता राऊत साहेब व शिंदे साहेब यांच्या कडे मदती करीता चर्चा करुन निवेदन दिले. वरील मंडळींनी सदर दुर्घटना घडलेल्या लोकांना आर्थिक मोबदला साठी पुर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी अपघातग्रस्त कुटुंबातील मीराबाई रामटेके, बंडू रामटेके, शुभम पेंढारकर व प्रभाग क्रमांक 1 मधील प्रा. जहीर एस सैय्यद, सतिश भोजेकर, प्रवीण मेश्राम इत्यादी नागरिक उपस्थित होते.