संजय नगर वार्ड येथील दर्गावस्ती प्रभागात अमृत कलश योजने अंतर्गत नळ जोडणी करण्यात यावी – यंग चांदा ब्रिगेडची मागणी
मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना निवेदन
मनपा हद्दीतील शेवटच्या टोकावर असलेल्या संजय नगर येथील दर्गावस्ती प्रभागात नळ नसल्याने येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीठ होत आहे. त्यामूळे या भागात अमृत कलश योजने अंतर्गत नळांसाठी पाईप लाईनची जोडणी करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या संजय नगर शाखेच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, संजय नगर प्रभाग प्रमूख आशा देशमूख, उज्वला शंभरकर, यमुना शिंदे, संतोशी यादव, साळुबाई वाघाडे आदिंची उपस्थिती होती.
संजय नगर येथील नागरिक गेल्या 30 ते 40 वर्षापासुन या प्रभागात वास्तव्यास आहे. येथे पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही. त्यामूळे येथील नागरिकांना घरगुती वापराच्या व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते, त्यामूळे येथे नळ उपलब्ध करुन देण्यात यावे अशी जूनी मागणी येथील नागरिकांची आहे. असे असतांनाही येथील नागरिकांची सदर मागणी सोडविण्यात आलेली नाही. दरम्याण आता शहरात अमृत कशल योजनेचे काम सूरु आहे. त्यामूळे या योजने अंतर्गत तरी नागरिकांच्या घरी नळ येतील अशी अपेक्षा होती. मात्र या योजनेच्या लाभापासूनही येथील नागरिकांना वंचित ठेवल्या जात आहे. परिणामी येथील नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामूळे त्यांच्या मागणीकडे गांभिर्याने लक्ष देत अमृत कलश योजने अंतर्गत या प्रभागात नळ जोडणी करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका आयुक्त विपीन पालिवाल यांना करण्यात आली आहे.