इंदिरानगर येथील नाल्याचे तात्काळ बांधकाम करा – यंग चांदा ब्रिगेडची मागणी
मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना निवेदन
नालीचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाला नसल्याने इंदिरा नगर येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामूळे येथे तात्काळ नाल्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या इंदिरा नगर शाखेच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशाराही यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष नरेश आश्राम, शहर संघटक तापोश डे, एसबीसी आघाडी शहर प्रमूख रुपेश मुलकावार, नितेश गवळे, वसीम कुरेशी, धीरज मानकर, सिध्दार्थ मेश्राम, अविनाश पवार, नितेश बोरकुटे, रवी मसराम, अजय मेश्राम आदिंची उपस्थिती होती.
इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या घरातील घरगुती वापराचे पाणी आणि सांडपाणी खुल्या जागेतून वाहत असल्याने येथे कृत्रीम मोठा नाला तयार झाला आहे. त्यामुळे परिसरातील नाल्यालगत असलेले घरांना क्षति पोहचत आहे. त्याशिवाय नाला पूर्णपणे खुला असल्याने डुकरांचा हौदासही येथे वाढत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंध आणि अस्वच्छता पसरत आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पती होऊन नागरिकांना कीटकजन्य व जलजन्य आजारांची लागण होत आहे. त्यामूळे या विषयाची गांभिर्याने दखल घेत येथे तात्काळ नाल्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका आयुक्त विपीन पालिवाल यांना करण्यात आली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती होती.