सिंधी नाल्यावरून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा
महसूल विभागाची बघ्याची भूमिका असंवेदनशील…
राजुरा, 20 जाने. : सध्या तालुक्यात रेती चोरीला बरेच उधाण आल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत असून महसूल विभागाची भूमिका असंवेदनशील अशीच दिसून येत आहे. सिंधी नाल्यात रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याची संधी हेरून स्थानिक ट्रॅक्टर मालक रेती चोरी करण्यात सक्रिय झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या नाल्यातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा सुरू असताना सुद्धा महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या असंवेदनशील पणामुळे संबंधितांचे स्थानिक रेती चोरट्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याची शक्यता जनतेतून व्यक्त केली जात आहे.
भरदिवसा सर्रासपणे ट्रॅक्टरने रेतीचा उपसा करून विक्री केली जात आहे. यामुळे ट्रॅक्टर मालकांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र महसूल विभागाला याची भनक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारवाई होत नसल्याने ट्रॅक्टर मालक रेती चोरी करण्याकरिता बरेच धस्तावले असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण तालुक्यातील नाले व नदीचे पात्रात रेती चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून संबंधित विभागाच्या आशीर्वादानेच की काय लखपती झाले आहेत. रेती चोरटे सक्रिय असताना सुद्धा महसूल विभागाच्या वतीने नगण्य कारवाईचे प्रमाण असल्याने तोकड्या आर्थिक लोभापायी कारवाईसाठी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी धजावत नाही की काय…? हा प्रश्न समोर येत आहे. कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येत नसल्याने रेती चोरटे चांगलेच मुजोर झाले असून महसूल विभागाचा यावर वचक नसल्याने भविष्यात हेच रेती चोरटे प्रशासनाला भारी पडतील यात तिळमात्र शंका नाही…!