रेल्वे मधून कोळशाची नित्यनेमाने चोरी, संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष
राजुरा, 14 जाने. : वेकोली अंतर्गत कोळशाची रेल्वेने वाहतूक केली जाते. हि वाहतूक केली जात असताना कापणगाव परिसरात रेल्वे सिग्नल करिता थांबली जाते. हा सिग्नल सोयीस्कर दिला जातो का? हाही संशोधनाचा विषय आहे. येथून दोन ते तीन कोळसा माफियांद्वारे 10 ते 12 जणांची टोळी रेल्वेतून कोळशाची नित्यनेमाने सर्रास चोरी करून ट्रॅक्टरने वाहतूक केली जाते. तीन ते चार दिवसांगोदर येथे एका कोळसा चोरट्याचा पाय तुटल्याचीही माहिती समोर येत आहे.
वेकोली प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे तसेच आरपीएफ ची मेहेरनजर असल्यामुळे कोळसा माफिया चांगलाच फोफावला असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. यामुळे संबंधित प्रशासनातील लागेबांधे या कोळसा चोरीला खतपाणी घालत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. कोळसा किंग सुरज बहुरीया हत्या प्रकरण, राजू यादव हत्या प्रकरण यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्ती घडून सुद्धा संबंधित विभागाकडून कमालीचे दुर्लक्ष होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी कोळसा माफिया कलह निर्माण करण्यात व गुंडशाहीला चालना देण्यास प्रशासन मश्गुल आहे का…? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेकोली प्रशासन पण यात लक्ष देताना दिसत नाही. नित्यनेमाने कोळसा चोरी सुरू असून सुद्धा आरपीएफ अनभिज्ञ असल्याने नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात टोळीयुक्त हत्याकांड होण्याची शंका नाकारता येत नाही. वाममार्गाने पैसा कमविण्याच्या हौशीने तरुण याकडे वळत असून यामुळे गँगवार सारखे प्रकार घडू शकतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा वाजणार हे निश्चीतच. रोज नित्यनेमाने होणारी कोळशाची चोरी थांबवून गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने पाऊले उचलावीत अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली जात आहे.