कर्मवीर मा. सा कन्नमवार यांच्या स्मरणार्थ 50 लक्ष रुपयातून अभ्यासिका साकारणार – आ. किशोर जोरगेवार
कर्मवीर मा. सा कन्नमवार यांच्या 122 व्या जयंतीनिमीत्य आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भातील पहिले नेतृत्व म्हणून ओळख असलेले राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा कन्नमवार यांची जयंती साजरी करत असतांना त्यांचे समाजोपयोगी विचार युवा पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील पुढाऱ्यांनी पूढाकार घेतला पाहिजे. मा. सा कन्नमवार हे पुस्तकप्रेमी होते. त्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक मोठी विकास कामे झालीत. सोबतच त्यांनी समाजहितासाठीही मोठे काम केले. त्यांचा हा वसा आता समाजातील युवा पिढीने समोर न्यावा, मा. सा. कन्नमवार यांच्या स्मरणार्थ बेलदार समाजाच्या अभ्यासिकेसाठी मी 50 लक्ष रुपये तर त्यांच्या नावाने असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरणासाठी 10 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
अखिल भारतीय विमुक्त, घुमंतु जनजाती वेलफेअर संघ दिल्ली, आणि महराष्ट्र, चंद्रपूर जिल्हा विदर्भ बेलदार समाज, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तारा लॉन येथे कर्मवीर मा. सा कन्नमवार यांच्या 122 व्या जयंतीनिमीत्य आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी अ. भा. वि. जा. भ. ज वेलफेअर संघ दिल्लीच्या सल्लागार प्रभा चिलके, सामाजिक कार्यकर्ता हिराचंद बोरकुटे, नगर सेवक पप्पू देशमूख, नगर सेवक राजेंद्र अडपेवार, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, भोई समाज सेवा संघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी नागपुरे, गोधली समाज संघटनेचे दिवाकर बावणे, बंडूपंत गंड्रतवार, सेवानिवृत्त मुख्यद्यापक दिवाकर पुद्दटवार, विदर्भ बेलदार तत्सम जमाती संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार, आनंदराव अंगलवार, रंजना पारशिवे आदि मान्यवरांची प्रमूख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, अत्यंत गरिब परिस्थितीतून मार्ग काढत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत प्रवास केला. त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा व ऊर्जा देणारा असाच आहे. मुख्यमंत्री पदावर असतांनाही त्यांनी अत्यंत साधी राहणीमान ठेवत जनतेच्या मनावर राज्य केले. पैसा कमविण्यापेक्षा मानस जोडण्याला त्यांनी प्राथमिकता दिली. त्यांच्या याच स्वभावामूळे त्यांच्याशी असंख्य जनता जुळली असेही ते यावेळी म्हणाले, मध्य प्रांतातील सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी नागपूर येथे सर्वात मोठे मेडिकल रुग्णालय उभारले दादासाहेब कन्नमवारांनी अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली. पैसे प्रांतीय सरकारकडून असो की केंद्रीय सरकारकडून असो मिळेल तेथून तो मिळवायचा व जेथे गरज आहे तेथे जनकल्यानार्थ उपयोगात आणावयाचा हेच त्यांचे विकासाचे धोरण होते.
राष्ट्रपूरुष यांच्या जयंती पूण्यतिथीचे परिपत्रक शासणाच्या वतीने दरवर्षी काढले जाते. या परिपत्रकानूसार सदर राष्ट्रपुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयात साजरी केल्या जाते. मात्र देशाच्या स्वातंत्र लढ्यात सहभाग घेणा-या कर्मवीर मा. सा कन्नमवार यांचे नाव या परिपत्रकात नसल्याची खंत बोलुन दाखवत त्यांचे नाव सदर परिपत्रकात सामविण्यात यावे या करिता शासनासोबात पत्रव्यवहार करणार असल्याची ग्याहीही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाज बांधवांना दिली. बेलदार समाजातील विद्यार्थ्यांनी आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात समोर येत शासणाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा सदर योजना समाजाच्या गरजूंपर्यत पोहचविण्यासाठी समाजानेही पूढाकार घ्यावा असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मा. सा. कन्नमवार यांच्या नावाने समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिका तयार व्हावी या करिता 50 लक्ष रुपये देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले, तसेच मा. सा. कन्नमवार यांच्या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी 10 लक्ष रुपये देण्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमात कोरोनायोध्दा व समाजात काम करणा-या समाजबांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.