नगरपरिषदेची ती तहकूब सभा, आज विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष
दारू दुकानाला हिरवी झेंडी की लाल दिवा ; उत्कंठा पोहचली शिगेला
कोरपणा-प्रतिनिधी : गडचांदूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा व सत्तारूढ नगरसेवकांना जनतेनी शहराचा विकास व जनतेला लागणाऱ्या चांगल्या सुविधांसाठी निवडून दिले. परंतु मागील काही महिन्यांपासून यांनी स्थलांतरित दारू दुकानांना ना-हरकत देण्याचा सपाटा लावला आहे. ही मंडळी शहराला दारूचा हब बनविण्याचा प्रयत्नात दिसत असून येथील जनतेला दारूडी जनता म्हणून प्रसिद्ध करण्याचा डाव तर नाही ना ? अशी शंका सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
येथील वार्ड नं. 5 प्रभाग क्रं. 3 मध्ये रमाकांत कोमावार यांच्या निवासस्थाना जवळ तसेच अतिशय वर्दळीच्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या मूख्यद्वार चौकात असलेल्या श्रीमती सुमनबाई बाबुराव कोटावार यांच्या इमारतीत जयस्वाल वाईन मार्ट किरकोळ देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी नप कडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. स्थानिक नागरिक व विरोधी पक्ष नगरसेवकांचा याला तिव्र विरोध असून नवीन दारू दुकानाला आता पुन्हा ना-हरकत देवु नये अशी विनंती सुद्धा येथील काही नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेला केली आहे.
मागील 9 डिसेंबर रोजी सभा झाली. मात्र 10 विषय घेऊन नगराध्यक्षांनी अचानकपणे सभा तहकुब केली होती. त्यावेळच्या विषय सुचित 14 वा विषय स्थलांतरित देशी दारू दुकानाचा होता. ती सभा आज सायंकाळी 4 वाजता होणार असल्याचे कळते.
शहरात जवळपास 12 विदेशी, 5 देशी दारूची दुकाने व बीअर शॉपी आहे. काही दारू दुकानाला अजूनही जनतेचा विरोध सुरू आहे. पुर्वीची दारू दुकाने शहरा बाहेर हलविण्याची मागणी होत असताना सत्ताधारी त्याला न जुमानता उलट नवी दुकाने आणण्याच्या बेतात असल्याने हे जनतेला वाकोल्या तर दाखवत नाही ना! अशा चर्चांना उधाण आले आहे. असे असताना पुन्हा एक देशी दारू दुकान आणण्याचा प्रयत्न येथील काही गर्भश्रीमंतांकडून सुरू असल्याचे आरोप होत आहे.
काही महिन्यापूर्वी अशाच एका स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत दिल्याने नगरपरिषदेची मोठ्याप्रमाणात किरकिरी झाली होती. जर याठिकाणी दारू दुकान सुरू झाले तर स्थानिक नागरिकांचा मनस्ताप वाढणार आहे. कारण ज्या इमारतीत हे दारू दुकान सुरू होणार आहे त्याच्या आजुबाजुला निवासी क्षेत्र असून येथील प्रत्येक कुटुंबातील मुले शिक्षण घेत असल्याने भविष्यात दारूच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे या इमारतीच्या बाजूला शासन मान्य गरीब व निराधार मुला मुलींचे वसतीगृह आहे. यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो असे एक ना अनेक कारण असल्याने विविध स्तरांतून याचा तीव्र विरोध होत आहे. असे असताना आता स्थानिक नगरपरिषद याला हिरवी झेंडी दाखवते की लाल? याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली असून विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.