आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे काळाची गरज – ठाणेदार अविनाश मेश्राम
दादापुर येथील नागदिवाळी महोत्सव
चिमूर/तालुका प्रतिनिधी : आपली आदिवासी संस्कृती निसर्ग पूजक आहे परंतु आज या संस्कृतीची जागा पाश्चिमात्य संस्कृती घेताना दिसत आहे. म्हणूनच आपली आदिवासी संस्कृती-परंपरा टिकवणे व तिचे संवर्धन करणे ही काळाजी गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले. ते दादापुर येथे माना आदिम जमात विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित नागदिवाळी सोहळ्यात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या वेळी अध्यक्षस्थानी संजय जांभूळे, पोलीस पाटील वैशाली तितरे, सरपंच विद्या खाडे, त.मु.स. व माना जमात अध्यक्ष अमोल नन्नावरे, सुधीर नन्नावरे, अर्चना नंदनवार, अल्का चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाणेदार मेश्राम यांनी नागदिवाळी महोत्सवाविषयी माहिती देत समाजाविषयी भेडसावनाऱ्या समस्या, समाज संघटन व समाजाचा शास्वत विकास या बाबीं साठी युवकांनी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून संजय जांभुळे यांनी आदिवासी माना जमातीला भारतीय संविधानाने १९५६ पासून घटनादत्त अधिकार बहाल केले असले तरी शासन माना जमातीला न्याय हक्का पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी माना आदिम जमात विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, समाज बांधव व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला शेकडो समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमोल नन्नावरे तर आभार नंदनी नन्नावरे यांनी मानले.