उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर, समाजातील युवकांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहा – खासदार बाळू धानोरकर
लोकसभा क्षेत्रात प्रत्येक तालूक्यात अत्याधुनिक वाचनालय उभारणार
चंद्रपूर : कुणबी समाजाची ओळख हि शेती करणारा समाज अशी आहे. परंतु बदलत्या समाज रचनेनुसार समाजबांधव हे गावाकडून शहराकडे येत आहेत. आता युवकांनी देखील उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. त्याकरिता चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक वाचनालय उभारण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. चंद्रपूर स्थित लक्ष्मीनगर, वडगांव येथील धनोजे कुणबी समाजाचे वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन धानोरकर यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर समाजाचे अध्यक्ष ॲड पुरुषोत्तम सातपुते, माजी आमदार ॲड वामनराव चटप, प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर कार्यवाह सुधाकरराव अडबाले, डॉ चेतन खुटेमाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी कोरोना काळात सामाजिक जाण ठेऊन वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या खासदार बाळू धानोरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यासोबतच रेशीमगाठी या पुस्तकाचे देखील लोकार्पण करण्यात आले.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, उद्याची चांगली पिढी घडविण्यासाठी तरुणांनी शिक्षित होण्यासोबतच संस्कारित होण्याची गरज आहे. त्यासाठी भावी जोडपे शोधताना रंगरूप न बघता एकमेकातील संस्कार आणि कार्यकर्तृत्व बघावे. त्यामुळे समाज प्रगल्भ होण्यास मदत होईल. कुटुंब संस्कारित जर झाला तर हा संपूर्ण कुणबी समाज सुसंस्कारित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.